पॅकिंगवर बळीराजाची मोहर : मुख्यमंत्र्यांनीही घेतली दखल यवतमाळ : जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील गणोरी या छोट्याशा गावातील सीताफळ महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह आता गुजरातपर्यंत पोहचले आहे. या सीताफळाच्या पॅकींगवर बळीराजा चेतना अभियानाच्या लोगोची मोहर उमटली आहे. विशेष म्हणजे या सीताफळाची दखल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीही घेतली. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या वाणाची पाहनी करण्यासाठी यवतमाळच्या दिशेने आगेकूच केली आहे. बाभूळगाव शहरापासून ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या गणोरी गावात शरदचंद्र उत्तरवार यांनी सीताफळाची लागवड केली. पूर्वी ही जमीन पडीत होती. कुठलेही पीक या ठिकाणी घेतले जात नव्हते. विशेष म्हणजे या भागात पाणी नाही. दोन विहिरी आणि दोन बोअरवेल केल्या नंतरही पुरेसे पाणी पिकांना मिळणे अवघड बाब आहे. कमी पाण्यात बागायती पीक घेण्यासाठी त्यांनी अभ्यास केला. आणि सीताफळाची निवड केली. मात्र यासाठी शेतकऱ्यानेच विकसीत केलेले वान त्यांनी शेतात लावले. सीताफळाचे हे वान पंढरपुरमधील बार्शी येथून त्यांनी आणले आहे. तीन एकरात एक हजार झाडांची लागवड केली. हे सीताफळ कमी बिया आणि अधिक मगस असणारे आहे. साधारणत: पाचशे किलोग्रॅम वजनाचे एक सीताफळ आहे. पारंपरीक सिताफळातील ही विकसीत जात आहे. यामुळे या सिताफळाला राज्यभरातून मोठी मागणी होत आहे. नागपूर, पुण, नाशिक आणि गुजरात मधील सुरतपर्यंत हे सिताफळाचे वान पोहचले आहे. या सिताफळाला ग्राहकाची चांगली पसंती लाभली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी सध्या त्यांची परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यवतमाळ दौऱ्यावर आले असताना त्यांनी या सिताफळाची पाहणी केली, यावेळी त्यांनी उत्तरवारांचे कौतुक केले. विशेष म्हणजे कमी पाण्यात येणारे वान असल्याने कृषी विभागाला या संदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. उत्तरवार यांनी सिताफळाचे पॅकिंग तयार केले आहे. त्याला बळीराजा चेतना अभियानाचा लोगो लावला आहे. या आकाराने मोठे आणि मगसदार सिताफळाने बाजारात एक वेगळ स्थान मिळविले आहे. या पिकाला वन्यप्राणी किंवा पक्षी खात नाही तसेच कुठल्याही पाणी टंचाईचा फटका बसत नाही. यामुळे हे फळपिक अकृषक क्षेत्रातही किफायदशीर ठरणारे आहे. उत्तरवार यांना या एक हजार झाडांपासून जवळपास चार लाखांचे उत्पादन झाले आहे. यासोबतच त्यांनी पाच एकरात मोसंबिची बाग लावली आहे. इतर क्षेत्रात ते पारंपरीक पीक घेत आहेत. काळानुसार होणारे बदल आणि नावीन्यपूर्ण शेतीच्या प्रयोगातून समृद्धी शक्य असल्याचे मत त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले आहे. (शहर वार्ताहर)
यवतमाळचे सीताफळ गुजरातला
By admin | Updated: January 9, 2017 02:08 IST