यवतमाळ : शहरात पार्किंगची समस्या कायम आहे. ती सध्या तरी सुटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. तरीही पार्किंग संबंधी पूर्वनियोजित सूचना व आदेश असल्यास त्याचे यवतमाळकरांकडून पालन केले जाते. पूर्वी प्रत्येक दुकानासमोर दुचाकी वाहनाच्या पार्किंगसाठी पट्टे मारण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक जण आपले वाहन या पट्ट्याच्या आत पार्क करण्याची खबरदारी घेत होते. त्यातून यवतमाळकर वाहनधारकांना शिस्तही लागली होती. परंतु वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बदलताच या पार्किंगच्या नियमाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोलीस कारवाई करीत नसल्याचे पाहून मग नागरिकांनीही पार्किंगची शिस्त मोडणे सुरू केले. आजही यवतमाळ शहरातील आणि विशेषत: मेन लाईन व व्यापारपेठेतील वाहतुकीची समस्या जटील झाली आहे. आधीच दुकानदारांचे रस्त्यावर आलेले अतिक्रमण व त्यापुढे बेशिस्तपणे पार्क केली जाणारी वाहने यामुळे रस्त्यावरून अनेकदा पायदळ चालणेही कठीण होऊन बसते. शहरात बसस्थानक चौकापासून सर्वत्र वाहतूक अस्ताव्यस्त आढळून येते. बसस्थानक चौकात चार ते पाच वाहतूक पोलीस दिवसभर तैनात असतात. मात्र ते सर्व जण चौकीच्या आश्रयाला असल्याचे आणि गप्पा-गोष्टींमध्ये व्यस्त असल्याचे चित्र पहायला मिळते. पोलीस रस्त्यावर नाही म्हणून वाहनधारक सर्रास सिग्नल लागण्यापूर्वीच सुसाट वेगाने निघून जातात. पोलिसांच्या नाक्कावर टिच्चून वाहतूक नियमांची ऐसीतैसी केली जाते. शहराच्या मुख्य चौकात ही स्थिती असेल तर इतर मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेची केवळ कल्पनाच केलेली बरी. यवतमाळ शहरात वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला असताना चार दिवसांपूर्वी वाहतूक शाखेने अचानक दुचाकी वाहने जप्त करण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेबाबत कोणतीही पूर्व कल्पना शहरवासीयांना दिली गेली नाही. किंवा दुकानासमोरील पार्किंगचे पट्टे आहेत की मिटले याची खातरजमाही केली गेली नाही. त्यातच या कारवाईचा शुभारंभ दत्त चौक भागातून करण्यात आला. वास्तविक या चौकात गेल्या काही दिवसांपासून भला मोठा खड्डा रस्त्याच्या मधोमध खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कुठे वाहन पार्क करावे आणि कोठून जावे याचा प्रश्न पडतो. असे असताना वाहतूक शाखेने थेट वाहन जप्तीची कारवाई सुरू केल्याने नागरिकांत रोष पहायला मिळत आहे. हीच कारवाई मेनलाईन व बाजारपेठेतही केली गेली. ही जप्ती करताना टोर्इंग व्हॅन वापरली गेली नाही. केवळ पोलिसांचा ढग्या (लॉरी) त्यासाठी वापरला जात आहे. क्रूरपणे नवी कोरी वाहने त्यात कोंबली जात आहे. त्यात वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. वाहनधारक तत्काळ हजर झाल्यानंतरही त्याचे वाहन बळजबरीने लॉरीमध्ये कोंबले जात आहे. त्याची विनवणी, माफी व जागीच असेल तो दंड भरण्याचा युक्तीवाद चड्डी-बनियान घालून वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी निघालेल्या पोलिसांकडून सर्रास धुडकावला जात आहे. एकीकडे चारचाकी वाहने सर्रास नियमांचे उल्लंघन करून खुद्द वाहतूक पोलीस शाखेच्या समोरुनच धावत आहे. अवैधरीत्या त्यातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेले जात आहे. मात्र त्यातून दरमहा हप्ता मिळत असल्याने ही चारचाकी वाहने नजरेआड केली जात आहे. शहरातही या वाहनांचे पार्किंग विचित्र पद्धतीने व वाहतुकीला अडथळा ठरणारे असते. परंतु वाहतूक शाखा त्यांच्यावर मेहेरबान आहे. तर दुसरीकडे दुचाकी वाहनधारकांना दंडुका दाखवून वाहतूक पोलीस कारवाईचा आव आणताना दिसत आहे. नव्याने रुजू झालेले एसपी संजय दराडे यांच्यापुढे आपले इम्प्रेशन कायम रहावे आणि ट्रॅफिकची खुर्ची जाऊ नये, प्रचंड स्पर्धेतही ती शाबूत ठेवता यावी, यासाठी ही सर्व धडपड सुरू असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जाते.
दुचाकी जप्तीने यवतमाळकरांची तारांबळ
By admin | Updated: August 18, 2014 23:48 IST