यवतमाळ : शहरातील उमरसरा परिसरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहे. येथील एका टोळीचा सदस्य असलेल्या युवकाला दोन जिवंत काडतूस व देशी कट्ट्यासह बसस्थानक परिसरात शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. मंथन अनिल लहाडके (१९) रा.धर्माजीनगर, मोठे वडगाव असे अटकेतील युवकाचे नाव आहे. उमरसऱ्यामध्ये एका टोळीचा उदय झाला. या टोळीच्या हालचालींवर पोलिसांचा वॉच आहे. याच टोळीत उठबस असलेला मंथन बसस्थानक परिसरात संशयास्पद स्थितीत फिरताना आढळला. याची माहिती मिळताच वडगाव रोडच्या शोध पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक सुगत पुंडगे, रावसाहेब शेंडे, आशीष चौबे, नीलेश राठोड, रितूराज मेडवे, गौरव नागलकर, सुधीर पुसदकर, सागर पथ्थे, साजीद खान, नासीर शेख, अंकुश फेंडर यांनी त्याला ताब्यात घेतले. (कार्यालय प्रतिनिधी) गँगवॉरची भीती वाढली उमरसरा परिसरात दोन गटांमध्ये अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. यातून गँगवॉर उफाळण्याची भीती वर्तविली जात आहे. विधिसंघर्षग्रस्त असलेले बालक आता सज्ञान झाल्याने त्यांची आणखी हिम्मत वाढली आहे. पोलिसांनी या टोळक्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास एखाद्याचा जीव जाण्याची स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे.
यवतमाळात देशीकट्ट्यासह युवकाला अटक
By admin | Updated: April 9, 2017 00:43 IST