स्मिताताई कोल्हे : सखी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा यवतमाळ : महिलेने मनावर घेतले तर कोणतेही काम अशक्य नाही. जग बदलविण्याची क्षमता महिलेतच आहे, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. मेळघाटसारख्या आदिवासी भागात काम करताना अनंत अडचणींचा डोंगर पार केला. त्यांच्यातीलच एक होवून काम केले, असे प्रतिपादन प्रख्यात समाजसेविका डॉ.स्मिताताई कोल्हे यांनी येथे केले. लोकमत सखी मंचच्यावतीने येथील दर्डा मातोश्री सभागृहात रविवारी आयोजित ‘लोकमत सखी सन्मान’ सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. मंचावर अमरावतीच्या समाजसेविका रजिया सुलताना, लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा आणि आर्णी येथील डॉ.कुमुदिनी नाफडे उपस्थित होत्या. डॉ.स्मिताताई कोल्हे यांनी मेळघाटातील आपला जीवनपटच उपस्थितांपुढे उलगडून दाखविला. गत ३३ वर्षांपासून आदिवासींमध्ये मिसळून नव्हेतर त्यांच्यासारखेच राहून त्या डोंगरदऱ्यात रुग्णसेवा करीत आहे. त्या म्हणाल्या, डॉ.रवींद्र कोल्हे यांनी लग्नासाठी चार अटी घातल्या होत्या. ४०० रुपयात घरसंसार चालविणे, ४० किलोमीटर पायी चालणे, पाच रुपयात लग्न आणि इतरांसाठी भिक मागण्याची तयारी अशा त्या अटी होत्या. या सगळ्या अटींचा मी विचार केला आणि रवींद्र कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मेळघाटात दाखल झाले आणि आज मी मेळघाटची झाले. मेळघाटात डॉक्टर म्हणजे पुरुष, असे समीकरण होते. मला कुणीही डॉक्टर म्हणून स्वीकारत नव्हते. महिला म्हणजे नर्सच असा त्यांचा समज होता. परंतु हरिरामवर वाघाने केलेला हल्ला आणि त्याच्यावर मी घातलेल्या ४०० ते ४५० टाक्यांनी मला मेळघाटात आदिवासींनी डॉक्टर म्हणून स्वीकारले. ज्या हरिरामवर मी टाके घातले तो माणूस आजही जिवंत आहे. मेळघाटचे वैभव सांगताना त्या म्हणाल्या, आमच्याकडे स्त्री भ्रूणहत्त्या हा प्रकारच नाही. सहा-सहा मुलानंतर मुलगी होईलच, अशी प्रतीक्षा करणारा येथील समाज आहे. आदिवासी स्त्री ही निर्भय असून हातात विळा घेवून ती कुठेही जावू शकते. स्वत:चे लग्न स्वत: ठरवते. आदिवासींची स्त्रीप्रधान संस्कृती असून येथे वृद्धाश्रमाला थारा नाही. वृद्ध माणसंही येथील झोपड्यांचा आधार असतात. मेळघाटच्या सेवेत ‘लोकमत’चा मोठा हातभार आहे. ‘लोकमत’ने आम्हाला वेळोवेळी मदत केली. नुकतेच ‘लोकमत’ने १५ लाख दिले असून त्यातून बैरागड येथे आॅपरेशन थिएटर बांधल्याचे सांगितले. सखी मंचने ग्रामीण महिलांना स्टेज दिला. ग्रामीण भागातूनच माणूस घडविला जातो, असे सांगत मुलांना यंत्र बनवू नका, त्यांना माणूस बनवा. मुलांना जगाचे दर्शन घडू द्या, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
महिलाच जग बदलवू शकते
By admin | Updated: October 25, 2016 02:38 IST