वणी : येथील मनीषनगरमधील युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरपूर येथील युवकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चेतना बंडू आस्कर (२०), असे मृतक तरूणीचे नाव आहे. गेल्या २८ जानेवारीला चेतनाचे शिरपूर येथील सागर किशोर धोबे या युवकासोबत साक्षगंध झाले होते. त्यानंतर २ मे रोजी लग्नही ठरले. वधू-वरांकडील सर्वांनी तयारी करून लग्नासाठी मंगल कार्यालयाचे बुकिंगही केले होते. सध्या सागर हा गडचिरोली येथील पोलीस विभागात कार्यरत आहे. दरम्यान लग्नाच्या काही दिवसांपूर्वी सागरने चेतनाच्या घरी नोटीस पाठवून लग्नास नकार दर्शविला. तोपर्यंत सर्वत्र लग्नपत्रिका पोहोचल्या होत्या. मात्र लग्न मंडपात नवरदेव पोहोचलाच नाही. यावरून चेतनाच्या कुटुंबीयांनी वणी पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. त्यानंतर ५ मे रोजी दोन्ही कुटुंब प्रमुखांनी एकत्र बसून आपसी समझोता केला होता. यानंतरही सागरने चेतनाला वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला. तिच्या आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळूनच शुक्रवारी चेतनाने गळफास घेतला, अशी तक्रार वडील बंडू आस्कर यांनी दिली. त्यावरून सागरविरूद्ध भादंवि ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
वणीत युवतीची आत्महत्या
By admin | Updated: May 21, 2016 02:27 IST