परजिल्ह्यातून आवक : गतवर्षी कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी घटविले क्षेत्र यवतमाळ : हिवाळी म्हणजे हिरव्या पालेभाज्यांची रेलचेल. अगदी सर्व सामान्यांच्या आवाक्यात पालेभाज्यांचे दर असतात. मात्र यंदा हिवाळा सुरू झाला तरी भाज्याचे दर मात्र उन्हाळ्यासारखेच आहे. गतवर्षी कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. सध्या भाजीबाजारातील दर सर्वसामान्यांचे डोळे विस्फारणारे आहेत. गतवर्षी पाच रुपये किलो विकल्या गेलेले वांगे यावर्षी २०-३० रुपये किलो दराने विकले जात आहे. वाल सुमारे ४० रुपये किलो, काकडी, भेंंडी, कारले ६० रुपये किलो तर फुलगोबी, टमाटे ३० रुपये किलो, शिमला मिर्ची, लवकी, गव्हार ६० रुपयाच्या घरात आहे. इतरही भाज्यांचे दर वाढलेलेच दिसून येतात. सर्वाधिक दर वाढले आहेत ते भाजीच्या फोडणीतील लसणाचे. सध्या बाजारात १६० ते २०० रुपये किलो दराने लसून विकला जात आहे. हिवाळ्यात दर कडाडण्यामागचे कारण म्हणजे गतवर्षी शेतकऱ्यांना बसलेला मोठा फटका होय. वांगे, टोमॅटो, पालक, सांभार, मेथी आदी भाज्यांची तोडाई मजुरीलाही परवड नसल्याने त्यावेळी शेतकऱ्यांनी बैलाला चारा म्हणून टाकली होती. त्यामुळे यावर्षीही अशीच स्थिती राहील म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी भाजीच्या क्षेत्रात घट केली. त्यामुळे भाजीपाला बाजारात कमी प्रमाणात येऊ लागला. परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाल्यामुळे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हिवाळ्यातही भाज्या विकत घेताना ग्राहकांना विचार करावा लागतो. (शहर वार्ताहर) आत्माचे भाजी विक्री केंद्र गेले कुठे ?ग्राहक आणि शेतकरी यांच्यात थेट विक्री व्यवहार करण्यासाठी आत्मांतर्गत यवतमाळच्या गार्डन रोडवर भाजी विक्री केंद्रासाठी गतवर्षी जागा उपलब्ध करून देण्यात आली. या ठिकाणी शेतकरी गटातील शेतकरी भाजी विकणार होते. प्रारंभी महिनाभर केंद्र चालविण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र त्यानंतर या केंद्रावर कुणी दिसलेच नाही. आता तर केंद्र कुठे गेले असा प्रश्न आहे. यवतमाळच्या बाजारात सकाळी भाज्यांचा लिलाव होतो. त्या ठिकाणचे दर आणि प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आलेल्या दरात तफावत असते. यात व्यापाऱ्यांचा फायदा होतो.
हिवाळ्यातही पालेभाज्यांचे भाव कडाडलेलेच
By admin | Updated: December 21, 2015 02:36 IST