केळी, ज्वारी, तिळाचे नुकसान : तीन जखमी, चार जनावरे दगावली, अनेक ठिकाणी घरावरील टिनपत्रे उडाली लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गुरूवारी झालेल्या वादळी पावसाने पाच तालुक्यांना जबर फटका बसला. यामध्ये पिकांचे लाखोंचे नुकसान झाले. घरांची पडझड झाली. तीन इसम जखमी झाले तर चार जनावरे दगावली. गुरूवारी यवतमाळ, दारव्हा, कळंब, घाटंजी आणि नेर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले. यामध्ये केळी, आंबा, तिळ आणि ज्वारी पिकाला मोठा फटका बसला. गावरान आंबा गळून पडला. केळीला जबर फटका बसला. पावसासह वादळाने तिळ पूर्णत: झोपला. तर काढणीला आलेली उन्हाळी ज्वारी पूर्णत: काळी पडली. यामुळे उन्हाळी पिकांना लाखोंचा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तालुका स्तरावर सुरू आहे. वादळाने घरावरील टिन उडाली. झोपड्यांचे छत हिरावले गेले. यवतमाळ तालुक्यातील तिवसा गावामध्ये सर्वाधिक नुकसान झाले. राजीव गांधी विद्यालयावरील टिन उडाले. या ठिकाणच्या फर्नीचरचे नुकसान झाले. अंतर्गत रस्त्यावर झाड उन्मळून पडले. यामुळे तारा तुटल्या. उमरखेड तालुक्यातील टेंभूरदरामध्ये टिन कोसळल्याने कौसल्या मेंढके, जनाबाई जाधव, रामचंद्र राठोड जखमी झाले. ब्राम्हणगाव, घाटाना, सोनखास हेटी आणि घाटंजीत चार जनावरे दगावले. २४ तासांपासून वीजपुरवठा ठप्प गुरूवारी बोरी परिसरात प्रचंड वादळासह पाऊस झाला. गुरूवारपासून या ठिकाणची वीज गुल झाली. ती शुक्रवारीही आली नाही. विशेष म्हणजे, या केंद्रात विजेचे काम करणारे कर्मचारीच नसल्याचे सांगितले जात आहे. दारव्हा तालुक्याला वादळाचा तडाखा दारव्हा : गुरुवारी झालेल्या वादळी पावसाचा तालुक्याला जबर तडाखा बसला. अनेक गावात घरावरील टीनपत्रे उडून गेली. शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश तहसीलदार प्रकाश राऊत यांनी दिले असून शनिवारपासून या कामाला सुरुवात केली जाणार आहे. दहेली, रामगाव, हरू, पिंपरी(खुर्द) या गावांमध्ये भाजीपाल्याचे पीक उद्ध्वस्त झाले. ब्रह्मी, गणेशपूर, भुलाई येथे केळीचे नुकसान झाले. पांढुर्णा, सावंगी(संगम) व वडगाव(गाढवे) येथील टीनपत्रे या वादळात उडून गेली. शनिवारपासून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक संयुक्त सर्वे करणार असल्याची माहिती नायब तहसीलदार विनोद हरणे यांनी दिली. वादळी पावसामुळे महावितरणचे प्रचंड नुकसान जिल्ह्यात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक गावातील पोल पडले. वायरवर झाडे कोसळल्याने वायर तुटून अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. कृषी पंप आणि पाणीपुरवठाही बाधीत झाला होता. शुक्रवारी सकाळपासून सर्वप्रथम गावातील आणि पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. यवतमाळ ग्रामीण, कोळंबी व जोडमोहा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात वायर तुटून नुकसान झाले. इतरही तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हिच परिस्थिती आहे. यामध्ये महावितरणची लाखो रुपयांची हानी झाली आहे.
वादळी पावसाचा पाच तालुक्यांना फटका
By admin | Updated: May 13, 2017 00:31 IST