शिंदोला : नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभलेल्या वणी तालुक्यातील काही जंगलात अवैध वृक्षतोडीमुळे जंगले विरळ होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची निवासस्थाने नष्ट होत असून वन्यप्राण्यांच्या काही प्रजातीच आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. निसर्गाने या तालुक्याला मुक्त हस्ताने वनसंपत्ती बहाल केली आहे. मात्र वृक्षतोडीमुळे आता अनेक जंगले विरळ होत आहे. परिणामी वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारीचे प्रमाणही वाढत आहे. अवैध वृक्षतोड व शिकारीमुळे वणी वन विभागांतर्गत येणाऱ्या कुर्ली बंदी आणि मेंढोली, शिरपूर परिसरातील जंगलात वास्तव्यास असलेल्या वन्यप्राण्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वणी वन विभागाअंतर्गत येणाऱ्या कुर्ली, कळमना, मेंढोली, बोरगाव, वरझडी या परिसरात विविध जातींचे वृक्ष असलेली जंगले आहेत. आता या वनजमिनीवर अतिक्रमणाचा सपाटा सुरू झाला आहे. अनेकांनी वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले आहे. या परिसरात दिवसेंदिवस शेती उपयोग व इंधनासाठी अवैध वृक्षतोड सुरू आहे.या जंगलातून पूर्वी तेंदू पत्ता, औषधी वनस्पती, मोहफुले आदी उत्पादने गोळा केली जात होती. आता ते कामही थंडावले आहे. रानमेवा गोळा करणे दुरापास्त झाले आहे. मोहाची झाडे नामशेष होत आहे. अनेक जंगलातील सागवान आणि चंदनाची झाडे नष्ट झाली आहे. पर्यावरणांचे संतुलन राखणाऱ्या वृक्षांचे घटते प्रमाण वन्यप्राण्यांसाठी अतिशय घातक ठरत आहे. गेल्या २५ वर्षांपासून या जंगलात अवैध वृक्षतोड व शिकार सुरू आहे. परिणामी काही वर्षांपूर्वी या परिसरात आढळणारे काळवीट, हरिण, सायाळ, मोर, ससा आदी प्राणी व पक्षी दिसेनासे झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे जंगलातील पाणवठे आटले आहे. परिणामी वन्यप्राणी चारा-पाण्याच्या शोधात भटकतात. परिसरातील सिंचनाखाली असलेल्या शेतात रात्री ते शिरकाव करतात. नेमकी हीच संधी हेरून शिकारी रात्री शेताच्या कुंपणालगत जाळे टाकून वन्यप्राण्यांना जाळ्यात ओढतात. अनेकदा गावातील मोकाट कुत्रेही वन्यप्राण्यांचा फडशा पाडतात. मात्र असे प्रकार नेहमीच दडपले जातात. वन्यप्राण्यांच्या शिकारीचे व वृक्षतोडीचे प्रमाण दिवसेंदिवस सतत वाढतच आहे. स्थानिक रहिवासी व वनखात्याच्या संयुक्त वन व्यवस्थापनातून जंगलाचे संरक्षण करण्याची गरज आहे. (वार्ताहर)
वन्यप्राण्यांच्या प्रजाती नामशेषच्या मार्गावर
By admin | Updated: April 25, 2016 02:12 IST