यवतमाळ : वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे राज्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हा मोठ्या संकटात अडकला आहे. त्याला मदत करण्यासाठी महसूल विभागाने क्रीडा स्पर्धा रद्द करून गोळा झालेला निधी मुख्यमंत्री सहायता कोषात जमा केला. आता जिल्हा परिषदेतही क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी हालचाली सुरू आहे. त्यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांकडून वर्गणी केली जाणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनानेही महसूल प्रशासनाप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी पुढे आल्यास काय वावगे ठरणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीपातील कापूस, सोयाबीनचे उत्पन्न बुडाले आता अवकाळी पावसाने रबीतील पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्याची आणेवारीही केवळ ४४ पैसे इतकीच लागली. त्यामुळे सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे. शासनही राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीला कसे हाताळावे या विवंचनेत आहे. सर्व घटकांनी अशा स्थितीत स्वत:हून मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांनी महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गोळा झालेला निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिला आहे. हाच कित्ता जिल्हा परिषद प्रशासनानेसुद्धा गिरवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या क्रीडास्पर्धेवर साधारणत: सहा ते सात लाख रुपये खर्च होता. १२ जानेवारीच्या आसपास या स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. एक वर्ष क्रीडास्पर्धा घेण्याऐवजी तो निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाच्या झोळीत टाकल्यास कौतुकास्पद ठरू शकते. या कृतीतून कर्मचारी आणि प्रशासनसुद्धा संवदेनशिलता जोपासत असल्याचे प्रतीत होते. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच यासाठी भूमिका घ्यावी जेणेकरून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलणे शक्य होईल. या मदतीने फार फरक पडणार नाही, मात्र दुष्काळी झळांनी होरपळलेल्यांना मानसिक आधार मिळेल. हेच काय ते या मदतीचे फलीत ठरू शकते. परिस्थितीवर मात करण्यासाठी मानसिक आधाराचीच खरी गरज असते. अगदी छोट्या-छोट्या मदतीतून तो मिळत असतो. परिस्थितीला तोंड देणाऱ्यांना धैर्य देण्याचे कामही फार मोलाचे ठरते. सुदैवाने ही संधी जिल्हा परिषद प्रशासनापुढे चालून आली आहे. आपणही संवेदनशिल आहोत हे दाखवून देण्याची हिच खरी वेळ आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
महसूलला जमले ते जिल्हा परिषदेला का नाही?
By admin | Updated: January 4, 2015 23:21 IST