लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शाळेत शिक्षक नसल्याने पालक आपल्या मुलांना खासगी शाळेत टाकत असल्याची ओरड आहे. जिल्ह्यात शिक्षकांची पदे गेल्या वर्षी पवित्र पोर्टलमधून भरण्यात आली. तरीही रिक्त पदांचा अनुशेष संपला नाही. जिल्हा परिषदेत ७०८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. नवीन शैक्षणिक सत्रातही विद्यार्थी व पालकांकडून शिक्षकांची मागणी होत आहे. वर्गात शिकवायला पूर्णवेळ शिक्षकच नसल्याने जाता आमचे गुरु कोण, असा प्रश्न विचारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.
विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक, सहायक शिक्षक, अशा विविध संवर्गातील चार हजार ८७९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी चार हजार १७१ पदे कार्यरत आहे. तर सहायक शिक्षकांची सर्वाधिक ७०८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अन्य जिल्ह्यांत पवित्र पोर्टलमधून शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत. यवतमाळ जिल्ह्याला पदभरतीसाठी नवीन शासन आदेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षकांसाठी टाहो फोडला जात आहे. गेल्या वर्षी शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टलमधून भरण्यात आली. त्यामुळे ३६८ शिक्षकांची भर पडली. मात्र, त्यानंतरही शिक्षकांची ओरड सुरूच राहिली. पेसा क्षेत्रात १९५ शिक्षकांना कंत्राटी म्हणून भरण्यात आले होते. त्यांना या शैक्षणिक सत्रात कंत्राटी तत्त्वावर ठेवण्याची वेळ आली आहे.
केंद्र प्रमुखांची १७० पदेही रिक्त; शिक्षकांकडे प्रभारजिल्ह्यात केंद्र प्रमुखांची १८० पदे मंजूर आहेत. त्यापैकी दहा केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा पदोन्नतीने कार्यरत आहेत. १७० केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असल्याने शिक्षकांना अतिरिक्त प्रभारी म्हणून कर्तव्य बजावावे लागत आहे. याचाही परिणाम अध्यापनावर होत आहे. एकाच वेळी शिक्षक आणि केंद्र प्रमुख म्हणून जबाबदारी पार पडताना अडचणी येत आहे. मात्र, रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासन निर्णय घेत नसल्याने कार्यरत शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे.