पुसद नगराध्यक्ष अनिता नाईक म्हणतात, लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : नगरपरिषदेच्या बैठकीत मी स्वत: प्रस्ताव ठेवते परंतु नगरपरिषदेत माझे कुणी ऐकतच नाही, आता मी काय करू? अशी उद्वीग्न प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असलेल्या नाईक घराण्याची सून आणि पुसदच्या नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांनी व्यक्त केली. आमच्यातीलच काही भाजपा, सेना, काँग्रेसशी हातमिळवणी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. नगराध्यक्षांच्या या वक्तव्याने नगरपरिषदेत असलेली अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. पुसद चेंबर आॅफ कॉमर्सचे शिष्टमंडळ गुरूवारी नगराध्यक्ष अनिता नाईक यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी केलेल्या या वक्तव्याने शिष्टमंडळातील सर्वच जण अचंबीत झाले. पुसद शहरात अतिक्रमण काढताना दुजाभाव झाला असून, प्रशासनाने अतिक्रमण काढताना जाणीवपूर्वक व्यापारी प्रतिष्ठाणांसमोर पायऱ्या व नालीचे नुकसान केले. तसेच शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शौचालय बांधणे आदी संदर्भात पुसद चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार यांच्या नेतृत्वात अनिताताई नाईक यांना गुरूवारी निवेदन देण्यात आले. चर्चेदरम्यान त्या म्हणाल्या, नगरपरिषदेमध्ये माझे कुणी ऐकत नाही, आता मी काय करू? असे हताशपणे सांगितले. तेव्हा ताई बैठकीत आपला विरोध कोण करतो, असे विचारले असता त्या म्हणाल्या, आमच्यातीलच काही भाजपा, सेना व काँग्रेससोबत हातमिळवणी करीत आहे. यावर सूरज डुबेवार यांनी तुम्ही असे बोलत असाल तर आम्ही कुणाकडे जावे, तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे, असे सांगितले. यानंतर नगराध्यक्षांनी तोडलेल्या पायऱ्या व नाल्यांचे बांधकाम त्वरित करून देण्याचे आदेश बांधकाम अभियंता शिवकांत पांडे यांना दिले. यावेळी चेंबरचे सचिव श्रीराम पद्मावार, सुर्यकांत अडतीया, रितेश व्यवहारे, राजेश मुराई, संजय भंडारी, गिरीष अनंतवार, कैलास अग्रवाल, प्रशांत गिऱ्हे, रुपेंद्र अग्रवाल, संगमनाथ सोमवार, अखिलेश अग्रवाल, ललित सेता, संजय बजाज, कैलास जगताप, राजू जेठवा, तुषार व्यवहारे, प्रवीण व्यवहारे, संदीप जिल्हेवार, प्रदीप अडतिया, पंकज भागवत, शिवकांत पांडे, सुभाष राठोड उपस्थित होते.
नगरपरिषदेत माझे कुणी ऐकतच नाही
By admin | Updated: May 12, 2017 00:21 IST