उमरखेड (कुपटी) : सिंचनातून समृद्धीचे स्वप्न पहात उमरखेड तालुक्यात बांधलेला अमडापूर लघुप्रकल्प सध्या पांढरा हत्ती ठरला आहे. २४१ हेक्टर सिंचन क्षमतेच्या या प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. परिणामी शेकडो शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. पाटबंधारे विभागाच्यावतीने उमरखेड तालुक्यात अमडापूर लघुप्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. २००३-०४ मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. सध्या या प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे. प्रकल्पाची मुख्य भिंत, सांडवा पुच्छ मार्ग, कालवा, पाटचऱ्या आदींच्या कामात तांत्रिक व आर्थिक मापदंड सोडून अभियंत व कंत्राटदारांनी गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. सध्यस्थितीत प्रकल्पाच्या कालव्याची कामे सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी केलेली कामे जागच्या जागी उद्ध्वस्त झाली आहे. कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. २००५ ते २०१४ पर्यंत प्रकल्पातून एक हेक्टरही जमीन ओलिताखाली आली नाही. प्रकल्पाचे अधिकारी मात्र आढावा बैठकीत सिंचनाचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याचे सांगून मोकळे होतात. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला तरीही सिंचनाची सोय मात्र झाली नाही. (वार्ताहर)
अमडापूर लघुप्रकल्प ठरला पांढरा हत्ती
By admin | Updated: January 6, 2015 23:09 IST