लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : झटपट श्रीमंत होण्याचा नाद अनेकांना जडला आहे. यातूनच गुप्त धनाच्या शोधात टोळके फिरत असते. काही ठिकाणी अघोरी पूजा करूनही गुप्तधन काढण्याचा प्रयत्न केला जातो. तालुक्यातील साकूर येथे शनिवारी रात्री गुप्तधनासाठी खोदकाम सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने सापळा रचून तेथे धाड टाकली. पाच जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली.
आकाश उखंडराव कोटनाके (३०), रा. साकूर हेटी यांच्या घरी एका खोलीत मांत्रिकाच्या माध्यमातून पूजा करून गुप्तधनासाठी खड्डा खोदला जात होता. खोदकाम सुरू असतानाच पोलिस तेथे धडकले. पूजेचे साहित्य जागेवर सोडून या टोळक्याने पळ काढला. त्यानंतर लगेच पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. आकाश कोटनाकेसह सोनू ऊर्फ कुणाल सुरेश खेकारे (३८), रा. सारखणी, ता. किनवट, ह.मु. कराडी-पुणे, वृषभ मनोहर तोडसकर (२४), रा. तिवसाळा, रा. घाटंजी, प्रदीप रामकृष्ण इळपाते (५०), रा. मेहा, ता. कारंजा, बबलू ऊर्फ निश्चय विश्वेश्वर येरेकर (२६), रा. देऊरवाडी, ता. आर्णी यांना अटक करण्यात आली. पाचही जणांविरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम-३ महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रतिबंध करण्याबाबत, तसेच समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ सह कलम ३ (५) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई ठाणेदार सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनात प्रवीण मानकर, संजय राठोड, रमेश कोंदरे, रणजित जाधव, गजानन खांदवे, सचिन पातकमवार, पंकज नेहारे, तुषाल जाधव, रूपेश नेव्हारे यांनी केली.
अघोरी मांत्रिक १३ दिवसांपासून रुग्णालयातलेकीला ११ महिने यवतमाळातील वंजारी फैल परिसरात उपचाराच्या नावाखाली माय-घरात डांबून ठेवत अमानुष छळ करण्यात आला. या गुन्ह्यातील अघोरी मांत्रिक महादेव ऊर्फ माउली परशराम पालवे हा ७जुलैपासून शासकीय रुग्णालयात भरती आहे. त्याने पोलिसांची धाड पडली असताना स्वतःच्या गळ्यावर चाकूचा वार करून घेतला. अनेक बाबींचा खुलासा होणे बाकी आहे. त्यानेही गुप्तधनासाठी नरबळी देण्याची तयारी केल्याचा कबुली जबाब पीडित मुलीने दिला आहे.