राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शतकोत्तरी परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात प्रचंड वाताहत झाली आहे. कार्यकर्ते कमी, नेतेच जास्त असे चित्र विविध कार्यक्रमांमध्ये पहायला मिळते. नेत्यांमधील गटबाजीमुळे येथे काँग्रेस पक्षाची शकले पडली असून पक्षाच्या कार्यालयाला कार्यकर्त्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. काँग्रेसने या जिल्ह्याला भरभरुन दिले. अर्धी हयात डोक्यावर लालदिवा घेऊन फिरलेले नेते जिल्ह्यात आहेत. या नेत्यांनाही पक्षाने सत्तेत असताना कधीच काही कमी पडू दिले नाही. त्यानंतरही आज जिल्ह्यात पक्षाची प्रचंड दैनावस्था झाली आहे. निवडणुकांमधील हार-जीत हा वेगळा भाग असला तरी पक्ष म्हणून काँग्रेसचे गाव खेड्यातील संघटन खिळखिळे झाले आहे. नेते मंडळी आपसात भांडत आहेत. एकमेकांचा हिशेब चुकता करण्यासाठी निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवाराऐवजी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला ताकद देण्याची विसंगत खेळी खेळली जात आहे. नेत्यांच्या भांडणामुळे काँग्रेसचे परंपरागत, प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. पक्षात नेत्यापूट गट असल्याने नेमके कुणाच्या सोबत रहावे, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळतो आहे.गेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड दाणादाण उडाल्यानंतरही काँग्रेसची नेते मंडळी एकजूट नाहीत. वर्षानुवर्षे विजयी करणारी जनता, पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते यांचा विचार होताना दिसत नाही. पक्षाच्या कार्यकर्त्याऐवजी दुसºया पक्षातील कार्यकर्त्यांना गोंजारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दुखावलेले कार्यकर्ते नेत्यांच्या मागे राहण्याऐवजी घरात बसणे पसंत करीत आहे. त्याचा परिणाम पक्षाच्या एकूणच कार्यक्रमांवर पहायला मिळतो आहे. पूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचंड वर्दळ रहायची. परंतु आता जयंती-पुण्यतिथीच्या कार्यक्रमालाही कार्यकर्ते दिसत नाहीत. २१ आॅगस्ट रोजी पार पडलेल्या स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमीत्त सद्भावना कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे हे विदारक चित्र पाहायला मिळाले.व्यासपीठावर जेवढे नेते, तेवढेच कार्यकर्ते त्यांच्यासमोर बसलेले असल्याचे हे चित्र काँग्रेसच्या तमाम नेत्यांसाठी आत्मचिंतन करायला लावणारे आहे. एकीकडे पक्षाच्या कार्यालयात ही स्थिती असताना नेत्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमात मात्र भरभरुन गर्दी पहायला मिळते. ही गर्दी झाली की केली गेली, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. हे चित्र न बदलल्यास आगामी निवडणुकांमध्येसुद्धा काँग्रेसची पुन्हा दाणादाण उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आधी नेत्यांनी एकत्र येणे अपेक्षित आहे. कार्यकर्ते एकजूट आहेतच. त्यांना केवळ नेत्यांमधील गट-तट संपण्याची तेवढी प्रतीक्षा आहे.यवतमाळच्या युवकाला दिग्रसची आॅफरगेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मायनस आणि भाजपाला प्लस करणाºया एका तरुण उमेदवाराला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिग्रस-दारव्हा मतदारसंघाची आॅफर देण्यात आल्याची माहिती आहे. त्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने पुढाकार घेतला. गेल्या आठवड्यात या युवकाला बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याला निवडणुकीत दिग्रस-दारव्ह्यात मदत करून त्या बदल्यात त्याची ताकद यवतमाळात आपल्या घरच्या उमेदवारासाठी वापरण्याचा मनसुबा असल्याचे सांगितले जाते.
काँग्रेस कार्यालयाला कार्यकर्त्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:38 IST
शतकोत्तरी परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात प्रचंड वाताहत झाली आहे. कार्यकर्ते कमी, नेतेच जास्त असे चित्र विविध कार्यक्रमांमध्ये पहायला मिळते.
काँग्रेस कार्यालयाला कार्यकर्त्यांची प्रतीक्षा
ठळक मुद्देनेत्यांच्या गटबाजीमुळे फिरविली पाठ : पक्षात नेतेच जास्त, नवसंजीवनी देणार कोण ?