यवतमाळ : अल्प पावसाने जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने रोहयोच्या कामात वाढ केली. ३५ लाख मजूर क्षमता असणारे काम उपलब्ध आहे. परंतु १३ हजार कामांना मजुरांची प्रतीक्षा असल्याने या योजनेला हादरा बसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पावसाने भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. मजुरांचे स्थलांतरण सुरू आहे. अशा स्थितीत शासनाने रोहयोच्या कामात वाढ केली. ग्रामपंचायत, वनविभाग, रस्ते आणि विहिरींसह १३ हजार १३७ कामांना मंजुरी मिळाली. मात्र या कामांवर मजूरच यायला तयार नाही. या सर्व कामांवर ३४ लाख मजुरांच्या हाताला काम देण्याची क्षमता आहे. परंतु जिल्ह्यातील मजूर रोहयोच्या कामावर यायला तयार नाही. मजूर का या कामांवर येत नाही. याकडे कुणाचेही लक्ष नाही. यामुळे जिल्ह्यातील रोहयोची कामे खोळंबली आहे. जिल्ह्यात १३ हजार कामांपैकी ८१ कामांनाच सुरुवात झाली आहे. संपूर्ण वर्षभरात ७० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची तरतूद या कामांसाठी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ४७ कोटींचा निधी खर्च झाला. यामध्ये ३० कोटी रुपयांचा निधी मजुरांवर खर्च झाला आहे. मात्र सद्यस्थितीत १३ हजार कामांना मजुरांची प्रतीक्षा असून रोहयोकडे मात्र जिल्ह्यातील मजुरांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. (शहर वार्ताहर)
१३ हजार कामांना मजुरांची प्रतीक्षा
By admin | Updated: December 21, 2014 23:06 IST