लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीत मौखिक परीक्षा आटोपली असून आता अंतिम निवड यादीची उमेदवारांना प्रतीक्षा आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असल्याने ही यादी लांबणीवर पडत असल्याचे सांगितले जाते.जिल्हा बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी नोकरभरती घेण्यात आली. खासगी एजंसीमार्फत ही आॅनलाईन भरती परीक्षा प्रक्रिया राबविली गेली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी साडेचारशे विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा (मुलाखती) ६ ते १० आॅगस्ट दरम्यान पार पडल्या. लिपिकाच्या १३३ जागांसाठी ४१२ तर शिपायाच्या १४ जागांसाठी ४४ उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलाविण्यात आले होते. दररोज शंभर उमेदवार या प्रमाणे या मुलाखती पार पडल्या. मुलाखत दिलेल्या या उमेदवारांना आता निवडीची अंतिम यादी जारी होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र त्यात एका न्यायालयीन याचिकेचा अडसर निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.जिल्हा बँकेच्या या नोकरभरतीत आरक्षण लागू करावे या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. हा निर्णय झाल्याशिवाय अंतिम निवड यादी जारी करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. यामुळे काय निर्णय येतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या प्रकरणात २२ आॅगस्टला उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संंचालक मंडळ सुमारे १२ वर्षांपासून कार्यरत आहेत. या संचालक मंडळाची निवडणूक घ्यावी, तोपर्यंत तेथे प्रशासक नेमावा या मागणीसाठी पुसद तालुक्यातील दोघांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर मंगळवार १३ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यात काय निर्णय होतो याकडे सहकार क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.
जिल्हा बँक नोकरभरतीच्या निवड यादीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 21:47 IST
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीत मौखिक परीक्षा आटोपली असून आता अंतिम निवड यादीची उमेदवारांना प्रतीक्षा आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असल्याने ही यादी लांबणीवर पडत असल्याचे सांगितले जाते.
जिल्हा बँक नोकरभरतीच्या निवड यादीची प्रतीक्षा
ठळक मुद्देसाडेचारशे उमेदवारांच्या मुलाखती : उच्च न्यायालयाच्या निर्णयावर नजरा