पोलीस ठाण्याचे टॉवर : बघ्यांची गर्दी, प्रशासनाची दमछाक दिग्रस : येथील पोलीस ठाण्यातील बिनतारी संदेश यंत्रणेच्या टॉवरवर चढून वर्षभरापूर्वी प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या श्यामने पुन्हा गुरुवारी याच टॉवरवर चढून वीरूगिरी सुरू केली. वृत्तलिहेस्तोवर टॉवरवरच होता. तर प्रशासन त्याची दिवसभर मनधरणी करीत होते. हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.श्याम गायकवाड रा. इसापूर असे वीरूगिरी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. गत वर्षी ७ जुलै रोजी त्याने टॉवरवर चढून असेच आंदोलन केले होते. त्यावेळी त्याला खाली उतरविण्यासाठी प्रशासनाने आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने तो गुरुवारी पुन्हा त्याच टॉवरवर चढून बसला. दिवस उजाडताच श्याम टॉवरवर बसून असल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती शहरात होताच बघ्यांची गर्दी झाली. श्यामने आपल्या आंदोलनाची माहिती व्हावी म्हणून टॉवरवरून निवेदनाच्या प्रती खाली फेकणे सुरू केले. तसेच त्याने आपल्या सोबत एक ध्वनीक्षेपकही नेला होता. त्यावरून तो आपल्या आंदोलनाची माहिती देत होता. दरम्यान सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नायब तहसीलदार प्रकाश खाटीक यांनी आंदोलन संपविण्याची सूचना दिली. ध्वनीक्षेपकाद्वारे त्याला सूचना दिल्या जात होत्या. मात्र तो आपल्या आंदोलनावर ठाम होता. मला बळजबरीने उतरविण्याचा प्रयत्न केला तर मी उडी घेईल आणि जीवनयात्रा संपवेल, असे सांगत होता. त्याला उतरविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. अग्नीशमन वाहन, आरोग्य विभागाचे वाहन घटनास्थळी आणण्यात आले. तहसीलदार नितीन देवरे, ठाणेदार संजय देशमुख, नायब तहसीलदार प्रकाश खाटीक आदी त्या ठिकाणी तळ ठोकून आहे. दरम्यान त्याच्या आईला इसापूरवरून बोलावून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वृत्तलिहेस्तोवर तो टॉवरवरच बसून होता. (प्रतिनिधी)
शेतजमिनीसाठी युवकाची दिग्रसमध्ये पुन्हा वीरूगिरी
By admin | Updated: October 30, 2015 02:15 IST