मारेगाव : यावर्षी मारेगाव तालुक्याची पीक आणेवारी ५० पैशाच्या खाली आहे. आता दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याने पीक विम्याचे पैसे कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. यावर्षी तरी विमा कंपन्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा हे वर्ष शेतकऱ्यांसाठी नापिकीचे ठरले आहे. लावलेला खर्र्चही न निघाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना फार मोठी आर्थिक मदतीची अपेक्षा होती. परंतु हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेल्याने आणि शेतमालाचे भावही गडगडल्याने निराशेच्या गर्देत शेतकरी सापडले आहे.आता शेतकऱ्यांच्या नजरा पीक विम्याकडे लागल्या आहे. यावर्षी कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेतून सक्तीने पीक विम्याची रक्कम कापून घेतली. त्यावेळी या निर्णयाला सर्वस्तरातून विरोध झाला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या रकमेतून व कोटींच्यावर हवामानावर आधारित पीक विमा काढण्यात आला. एवढी मोठी रक्कम पीक विम्यात गुंतविल्याने आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देत नसल्याने, गुंतविलेल्या पैशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.आता हाच पीक विमा शेतकऱ्यांना तारणहार ठरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. मात्र अजूनही पीक विमा मिळणार की नाही, याबद्दल कुणीच काही बोलत नाही. त्यामुळे विमा कंपन्या यावर्षीही आपली फसवणूक तर करणार नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांना सतावत आहे. याबाबत सक्तीने पीक विमा काढणाऱ्या बँकाही काही बोलायला तयार नाही. शासन व विमा कंपन्या मूग गिळून चूप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळणार की नाही, याची हुरहूर लागली आहे. शासन व पीक विमा कंपन्यांनी विम्या संबंधातील धोरण त्वरित जाहीर करून दुष्काळीस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
पीक विम्याकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा
By admin | Updated: December 24, 2014 23:08 IST