मोरचंडी जंगलात उपोषण : स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्याचे जीणे उमरखेड : तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ४२ गावांच्या समस्या स्वातंत्र्यानंतरही अद्याप सुटल्या नाही. आतापर्यंत अनेक आंदोलने करूनही कुणी फारसे लक्ष दिले नाही. आता गत तीन दिवसांपासून बंदी भागातील मोरचंडी जंगलात आमरण उपोषण सुरू केल्याने बंदी भागाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात ४२ गावे आहेत. या गावात ३० हजारांपेक्षा अधिक नागरिक राहतात. इंग्रजांच्या काळापासून ही मंडळी उपेक्षिताचे जीणं जगत आहे. देश स्वातंत्र झाल्यानंतर या भागातील समस्या सुटतील, रस्ते, पाणी, वीज होईल, अशी अपेक्षित होती. परंतु अद्यापही एकही समस्या सुटली नाही. उलट पैनगंगा अभयारण्य झाल्यानंतर येथील समस्यात वाढ झाली. पैनगंगा अभयारण्याचे जाचक नियम विकासाच्या आड येत आहे. डांबरी रस्त्यांवरून वन्य प्राण्यांना चालताना त्रास होतो म्हणून या भागात डांबरी रस्ते केले जात नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांचा जीव माणसाच्या जीवापेक्षा मोठा आहे का असा सवाल या भागातील करतात. शिक्षण, आरोग्य आदी समस्याही कायम आहे. या भागातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा आंदोलने केली. मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. परंतु अद्यापही या भागातील नागरिकांंना न्याय मिळाला नाही. मोरचंडी ते एकंबा या दोन किलोमीटर रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत काम मंजूर झाले आहे. खडीकरण व मजबुतीकरणासाठी २७ लाख रुपये मंजूर होते. त्यातून करण्यात आलेले काम अत्यंत थातूरमातूर झाले आहे. आता या रस्त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता पुन्हा बंदी भागातील समस्या घेऊन मोरचंडी जंगलात नागरिक उपोषणाला बसले आहे. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. आता तीन दिवस झाले तरी अद्यापपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जेवली, थेरडी, जवराळा, गाडीबोरी, डोंगरगाव, मोरचंडी, सोनदाबी, पिंपळगाव, खरबी या गावातील नागरिक येथे येत आहे.(शहर प्रतिनिधी)
बंदी भागातील विविध प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By admin | Updated: January 7, 2017 00:39 IST