वणी : लोकसभा निवडणुकीत यावेळी प्रथमच निवडणूक आयोगाने ‘नोटा’ची सुविधा उपलब्ध करून दिली होती. नोटा उपलब्ध झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील तब्बल आठ हजार २५७ नागरिकांनी या नकाराधिकाराचा वापर करून उमेदवारांना चपराक लगावली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत मतदारांना ‘नोटा’चा (यापैकी एकही उमेदवार लायक नाही) पर्याय उपलब्ध करून दिला होता. निवडणुकीच्या रिंगणातील एकही उमेदवार मतदाराला लायक वाटत नसल्यास, त्याने ‘नोटा’चे बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली होती. आयोगाच्या या संधीचा चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील तब्बल आठ हजार २५७ मतदारांनी लाभ उठवून आपला मतदानाचा अधिकार बजावला. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील राजुरा विधानसभा मतदार संघात एक हजार ७२४, चंद्रपूरमध्ये एक हजार १९५, बल्लारपूरमध्ये एक हजार ४७३, वरोरामध्ये एक हजार ३३७, वणीत एक हजार २0२, तर आर्णी विधानसभा मतदार संघात एक हजार ३२१ मतदारांनी ‘नोटा’चे बटन दाबले. तब्बल आठ हजार २५७ मतदारांनी लोकसभा निवडणूक रिंगणातील १८ उमेदवारांपैकी एकही उमेदवार लायक नसल्याचे त्यातून दर्शवून दिले. मात्र लाखो मतदारांनी रिंगणातील उमेदवारांच्या पारड्यात मते टाकून ही बाब झिडकारली आहे. निवडणूक कामावर असलेल्या कर्मचार्यांना आयोगाने पोस्टल बॅलेटचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. हे सर्वच कर्मचारी अर्थात सुशिक्षित आहेत. ते आपल्या पदावर म्हणूनच जबाबदारीने कामही करतात. मात्र पोस्टल बॅलेटने प्राप्त झालेल्या मतांपैकी तब्बल १४५ कर्मचार्यांची मते अवैध ठरली आहे. ९८९ कर्मचार्यांनी मात्र बरोबर मतदान केले आहे. तब्बल १४५ कर्मचार्यांची मते अवैध ठरल्याने आता त्यांच्या सुशिक्षितपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
मतदानात ‘नोटा’चा वापर
By admin | Updated: May 18, 2014 23:56 IST