यवतमाळ : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद पुढे सरसावली असून या कुटुंबांना ३० लाख रुपयांचा युरिया मोफत देण्याचा ठराव सोमवारी झालेल्या कृषी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच २ कोटी ९२ लाखांचे कृषी उपयोगी साहित्यही केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी समितीचे सभापती बाळासाहेब मांगुळकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत विविध ठराव घेण्यात आले. सर्वप्रथम सेस फंडातून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दोन बॅग युरिया, बोरॉन आणि फेरस ही सूक्ष्म अन्नद्रव्य मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. हरभऱ्याप्रमाणेच शासनाने गव्हाच्या बियाण्यावरही सबसिडी द्यावी, असा निर्णय घेतला. शेतकऱ्यांमध्ये युरियाचे वाटप तालुका कृषी अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून केले जाणार आहे. या शिवाय सेस फंडातून २ कोटी ९२ लाखांची साहित्य खरेदी केली जाणार आहे. त्यात १ कोटी २० लाखांचे इलेक्ट्रीक मोटरपंप, ४० लाखांचे एसडीपी पाईप, २० लाखांचे पीव्हीसी पाईप, १५ लाखांचे आॅईल इंजीन, १० लाखांचे पेरणी यंत्र १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांमध्ये वितरित केले जाणार आहे. जिल्ह्यातील नजरअंदाज पीक पैसेवारी भरमसाठ दाखविण्यात आली असून प्रत्यक्षात अशी पीकस्थिती जिल्ह्यात नसल्याचे अनेक सदस्यांनी सभेत मांडले. सोयाबीनचे पीक हातचे गेले असून कपाशीचीही पातेगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शासनाची नजरअंदाज पैसेवारी कमी करावी, असा ठरावही समितीने घेतला. अनेक शेतकऱ्यांचे तुषार व ठिबक संचाचे अनुदान रखडले आहे. ते त्वरित वितरित केले जावे, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून शेतकऱ्यांना हरभरा बियाणे पुरविण्यात येते. या बियाण्याची अतिरिक्त मागणी पूर्ण केली जावी, शिवाय हरभऱ्याप्रमाणेच गव्हाचे बियाणेही शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेतून देण्यात यावे, असा ठराव समितीने घेतला. बैठकीला कृषी विकास अधिकारी जगन राठोड आणि तालुक्यातील कृषी अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
३० लाखांचा युरिया मोफत
By admin | Updated: September 29, 2015 03:48 IST