हंसराज अहीर : खऱ्या लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी मेळावा घेणारयवतमाळ : मुद्रा योजनेंतर्गत जिल्ह्यात ज्या प्रमाणात कर्जवाटप होणे आवश्यक होते, तसे झाले नाही. केवळ व्यवसाय सुरू असणाऱ्या व्यक्तींना व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज दिले जात आहे. नवीन व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देणे अपेक्षित असताना या कर्जवाटपाचे प्रमाण नगण्य आहे, अशा शब्दात केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नाराजी व्यक्त केली. मंगळवारी येथील महसूल भवन येथे मुद्रा योजनेसह केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा अहीर यांनी घेतला. या बैठकीला आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते. कर्जवाटपाचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मुद्रा योजनेत जिल्ह्यात कर्जवाटपाची टक्केवारी वाढविण्यासाठी लाभार्थ्यांचा मेळावा घेण्याची सूचना बैठकीत हंसराज अहीर यांनी अग्रणी बँकेला केली. या मेळाव्यात मुद्रा बँक योजनेसह केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना या विविध योजनांचे लाभार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. मेळाव्यात लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले जातील. विविध बँकांचे स्टॉल यावेळी लावण्यात येतील. जिल्ह्यात १० ते १५ जूनच्या दरम्यान या मेळाव्याचे आयोजन केले जाणार असल्याचे अहीर यांनी सांगितले. मेळाव्यात बँकांच्या वतीने लाभार्थ्यांना योजनांचे अर्ज दिले जातील. पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारून ते मंजूर करण्याची कार्यवाही केली जाईल. तसेच विमा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा विमा उतरवून घेतला जाणार आहे. तसेच योजनांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार असल्याचे आढावा बैठकीत सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
‘मुद्रा’च्या कर्जवाटपावर केंद्रीय राज्यमंत्र्यांची नाराजी
By admin | Updated: May 25, 2016 00:17 IST