चौकशीचे आदेश : दारव्हा येथे दोन कंपन्यांचा साठा सील सुरेंद्र राऊत यवतमाळ शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांना प्रलोभने देऊन सुमार दर्जाचे बियाणे माथी मारणाऱ्या कंपन्या आता जिल्हा प्रशासनाच्या निशाण्यावर आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहे. त्यानुसार दारव्हा येथे कृषी विभागाने केलेल्या कारवाईत दोन कंपन्यांचा साठा सील करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या तोंंडावर दरवर्षी बियाणे कंपन्या शेतकऱ्यांना विविध प्रलोभने देऊन आपला माल त्यांच्या माथी मारतात. बियाणे खरेदीवर आकर्षक आॅफर दिली जाते. कूपन मिळाल्यास भेट वस्तू मिळणार, मोबाईल रिचार्ज मिळणार अशी एक ना अनेक प्रलोभने दाखवितात. मुळात हा प्रकार लकी ड्रॉ पद्धतीत मोडणारा आहे. परंतु कोणतीही परवानगी न घेता कंपन्या आपले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. उत्पन्नाची हमी तर नेहमीच दिली जाते. या कंपन्या निवडणूक प्रचाराला लाजवेल अशा पद्धतीने जाहिराती करून बियाण्यांची विक्री करतात. यातून अनेकदा शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारले जाण्याची शक्यता असते. जिल्ह्यात अलिकडच्या काळात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वरिष्ठांपर्यंत तक्रार करूनही उपयोग झाला नाही.दारव्हा तालुक्यात २०१३ मध्ये बोगस बियाण्यांचे प्रकरण चांगलेच गाजले. नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्याने कृषी आयुक्तापर्यंत धाव घेतली. परंतु उपयोग झाला नाही. नुकसानीचा मोबदला मिळालाच नाही. दोन वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणात बियाणे कंपन्यांनी प्रलोभने देण्याचा आधार घेतला आहे. कूपन मिळालेल्या शेतकऱ्याला त्या कुपनावर बियाणे खरेदीची सक्ती केली जाते. एखादे गिफ्ट हॅम्पर लागल्याचे सांगून ठराविक रक्कम जमा करा आणि गिफ्ट घेऊन जा अशा आॅफर दिल्या जात आहे. यामुळे आर्थिक संकटात असलेला शेतकरी छोट्या फायद्यासाठी मोठे नुकसान करून घेत आहे. याबाबत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे ई-मेलवर तक्रार आली. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बियाण्यांचा साठा तपासण्याचे निर्देश जिल्हा कृषी विकास अधिकारी आणि कृषी अधीक्षकांना दिले आहे. याच आदेशावरून दारव्हा तालुक्यात जे.के. सिडस्चे कपाशी वाण ८८६६ आणि राशी सिडस्चा साठा सील केला आहे. या कंपन्यांनी लकी ड्रॉची अधिकृत परवानगी घेतली आहे काय याची तपासणी केली जात आहे. त्याच प्रमाणे इतर कोणत्या बियाणे कंपन्यांनी तशी आॅफर शेतकऱ्यांपुढे ठेवली आहे याचीही चौकशी केली जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना प्रलोभने देणाऱ्या बियाणे कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे.दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल दारव्हा तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे ई-मेलवरून थेट तक्रार केली. यात विविध कंपन्या आपले बियाणे विकण्यासाठी कशी प्रलोभने देत आहेत. याची माहिती दिली. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले असून यामुळे प्रलोभने देणाऱ्या बियाणे कंपन्यांच्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.तक्रारीच्या सत्यतेची पडताळणी करणे सुरू आहे. सर्व उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारीसुद्धा बियाण्यांची चौकशी करीत आहे. दोषी कंपन्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल.- दत्तात्रेय गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
दरडीखाली तीन घरे गाडली
By admin | Updated: June 23, 2015 00:24 IST