दारूबंदीचा परिणाम : रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिक ग्लासचा खच लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५०० मीटरआतील दारू दुकाने बंद करण्यात आली आहे. याचा उमरखेड शहरात उलट परिणाम झाला असून दारुडे गुप्त पद्धतीने दारू मिळवून मोकळ्या मैदानातच मैफिल जमवत आहेत. उमरखेड शहरातील मैदाने ओपन बार झाले असून या ठिकाणी रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिक ग्लासांचा खच पडलेला दिसतो. उमरखेड शहरातील नांदेड, महागाव, ढाणकी, पुसद मार्गावरील सर्व दारू दुकाने बंद झाली आहे. त्यामुळे दारुड्यांची मोठी पंचाईत होत आहे. परंतु आजही छुप्या पद्धतीने दारू शहरात उपलब्ध होत आहे. अशा पद्धतीने दारू मिळवून अनेक दारुडे मोकळ्या मैदानातच मैफिल जमवत आहे. शहरात असलेल्या मोकळ्या मैदानात दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रकार उत्पादन शुल्क आणि पोलिसांना माहीत आहे. परंतु कुणावरही कारवाई केली जात नाही. शहरातील दारुडे चोरट्या पद्धतीने दारू मिळवून आपल्या दुचाकीने अथवा चारचाकी वाहनाने शहराबाहेरील मैदानात जातात. सोबत प्लास्टिकचे ग्लास आणि पाण्याचे पाऊचही नेतात. तेथे रात्री उशिरापर्यंत मैफिल जमवितात. यात अनेक तरुणही सहभागी असतात. अवैधरीत्या हा प्रकार खुलेआम सुरू आहे. परंतु कोणीही त्याच्यावर कारवाई करताना दिसत नाही. विशेष म्हणजे या मैदानात दारू प्राशन केल्यानंतर अनेक तरुण तेथे गोंधळ घालतात. बारमध्ये रात्री ११ वाजेपर्यंतचेच बंधन होते. पंरतु आता येथे उत्तर रात्रीपर्यंत दारुड्यांची मैफल सुरू असते. जोरजोराने ओरडणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू असतात. गावठी दारूची विक्री वाढली उमरखेड शहरासह ग्रामीण भागातील दारू दुकाने बंद झाल्याने मोहफुलापासून तयार करण्यात येणाऱ्या गावठी दारूचा बोलबाला सुरू आहे. शहरात ही दारू सहज उपलब्ध होत असून अनेकजण ग्राहकांना घरपोच दारू देत असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात दारू गाळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. ही दारू सायकल किंवा मोटरसायकलने शहरात आणली जाते. परंतु पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. सायंकाळच्या वेळी फेरफटका मारला तरी असे दारुडे मैदानात दिसून येतात.
उमरखेडची मैदाने बनली ‘ओपन बार’
By admin | Updated: June 1, 2017 00:19 IST