थर्टी फर्स्टची रात्र : यवतमाळ व पांढरकवडा येथे कारवाई यवतमाळ/पांढरकवडा : नववर्षाच्या जल्लोषात घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या नागपूरच्या तरुणांना यवतमाळ आणि पांढरकवडा येथे देशी कट्टा आणि राऊंडसह जेरबंद करण्यात आले. दोन आरोपी पसार झाले. तर यवतमाळ शहरात नववर्षाच्या स्वागताला गालबोट लावू पाहणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली. ३१ डिसेंबरच्या रात्री संपूर्ण जिल्ह्यात नववर्षाचा जल्लोष सुरू होता. सर्वत्र उत्साहाला उधाण आले असतानाच यवतमाळच्या गांधी चौक परिसरात शनिवारी रात्री १ वाजता गस्तीवर असलेल्या पोलिसांनी नागपूरच्या तरुणाला घातक शस्त्रासह अटक केली. कमलेश उर्फ विक्की अनिल चंद्रीकापुरे (३१) रा. हुडको कॉलनी आंबेडकर पार्क जरीपटका नागपूर आणि त्याचा यवतमाळातील सहकारी सुमित रवी बागडे (२६) रा. पंचशील चौक तलावफैल अशी त्यांची नावे आहे. गांधी चौक परिसरात दुचाकीवरुन संशयास्पद फिरणाऱ्या दोघांना टोळीविरोधी पथकाने हटकले. यावेळी कमलेशची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी कट्टा, मॅग्झीन व चार गोळ्या आढळून आल्या. त्याच्यासोबत असलेल्या सुमितलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई टोळीविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, जमादार ऋषी ठाकूर, किरण पडघन, अमोल चौधरी, विनोद राठोड, गणेश देवतळे, आशिष भुसारी यांंनी केली. पांढरकवडा येथे क्षुल्लक कारणावरून मारहाण करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागपूरच्याच एका तरुणाकडून पोलिसांनी देशी कट्टा व राऊंड जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पांढरकवडा येथील वाय पॉर्इंटजवळ करण्यात आली. दोन जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. शुभम सहदेव प्रधान (२०) रा. एमआयडीसी एरिया हिंगणा रोड नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री पिंपरी येथील अमर सलाम व पारेख सलाम हे वाय पॉर्इंटजवळ थांबले असता दारूच्या नशेत असलेल्या तीन युवकांनी त्यांच्यासोबत वाद घातला. या वादात शुभम व पारेख यांच्या हातातील डबा हिसकावून त्यांच्याच डोक्यावर मारला. फायटरनेही मारहाण केली. याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांंना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले असता तिघेही आरोपी पळून गेले. पीएसआय माने यांनी पाठलाग केला असता पांढरकवडाच्या खोजा कॉलनीजवळ शुभम प्रधान याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून एक देशी कट्टा व एक राऊंड जप्त केला. दोघे जण मात्र पसार झाले. पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. पांढरकवडा आणि यवतमाळ येथे नागपूरचे दोन तरुण देशी कट्टा घेऊन नेमके कशासाठी आले होते. घातपात तर करायचा नव्हता ना असा संशय व्यक्त केला जात आहे. नववर्षाच्या जल्लोषात झालेल्या या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी) ३१ डिसेंबरच्या रात्री १.३० वाजताच्या सुमारास अट्टल चोरटा विक्की उर्फ अंड्या बंडू डोंगरे (१९) रा. वाघापूर याला संशयास्पद फिरताना सहायक फौजदार भीमराव सिरसाट यांनी अटक केली. यवतमाळच्या आदिवासी सोसायटीत उघड्यावर डिजे लावून मद्यपमान करणाऱ्या चौघांनी पोलिसावर हल्ला केल्याची घटना ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. चार्ली पथकातील शिपाई इस्माईल अशपाक पटेल यांच्यावर आरोपी सुरज गोपाल मोरवाल (२२), प्रदीप पुरुषोत्तम सलामे (३०), सोमेश देविदास तरकडे (२९), अमोल नामदेव आडे (२८) सर्व रा. आदिवासी सोसायटी यवतमाळ यांनी हल्ला केला. त्यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तलवार घेऊन धुमाकूळ घालणारा अटकेत यवतमाळच्या नेताजीनगर परिसरात हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या किशोर सुभाष जोगदंड (२३) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तर साईबाबानगर परिसरात धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या विनोद महादेव खडसे (३५) रा. मालाणीनगर याला चार्ली पथकातील शिपाई अंकुश फेंडर व मोहंमद जुनेत यांनी अटक केली. तर वडगाव येथील पेट्रोल पंप परिसरात अतुल प्रल्हाद झिलपे रा. शास्त्रीनगर लोखंडी पूल याला चौघांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे झिलपेला तेथे फोन करून बोलाविले होते.
दोन देशी कट्ट्यांसह नागपूरचे दोघे जेरबंद
By admin | Updated: January 2, 2017 00:20 IST