मराठवाड्यातील तस्कर : महसूलची कारवाईउमरखेड : पैनगंगा नदीच्या विदर्भातील हद्दीत रेतीची तस्करी करणाऱ्या मराठवाड्यातील आठ ट्रॅक्टर मालकांना तब्बल दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईने रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ४ फेब्रुवारीला प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. त्यांनी उमरखेडचे उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला व उमरखेडचे तहसीलदार भगवान कांबळे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यावरून महसूल प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील कारखेड रेती घाटावर धाड मारली. त्यावेळी आठ ट्रॅक्टर रेतीचे अवैध उत्खनन करीत असल्याचे आढळून आले. त्यावरून अशफाक खान रहेमान, श्रीस गोपाळराव मनारकर, उमाकांत भगवतीदास भोरे, रामदास आनंदराव पऊळ, सुधीर बळवंतराव कदम, योगेश पंडितराव निळे, बळीराम शिंदे, संदीप देशमुख (सर्व रा.हदगाव, जि.नांदेड) यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईत मंडळ अधिकारी भालचंद्र शिरभाते, विजय शिंदे, गजानन सुरोशे, बालाजी माने, गोविंद खंडेलवाल, सुभाष आढाव, रामदास गारूळे, पी.एन. कानडे, दिनेश डाकले, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीबाई मलकुलवार, एस.एम. पठाण यांनी ही कारवाई केली.उमरखेड तालुक्यातील रेती घाटावर मराठवाड्यातील रेती तस्करांचा गेल्या अनेक दिवसांपासून हैदोस सुरू आहे. अनेक घाटांचे लिलाव होण्यापूर्वीच रेती घाटात मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतरही महसूल प्रशासन दखल घेत नव्हते. त्यामुळे शासनाच्या महसुलाला चुना लागत होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यावरून तत्काळ कारवाई करण्यात आली. यापुढे रेती तस्करी होवू नये म्हणून रेती तस्करांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. सात मंडळ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात सात पथके तयार केली असून ते यावर नियंत्रण ठेवणार असल्याचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
अवैध रेतीप्रकरणात दोन लाखांचा दंड
By admin | Updated: February 12, 2016 03:01 IST