मध्यप्रदेशमध्ये विक्री : वर्धा येथून झाल्या होत्या बेपत्ता यवतमाळ : मुलींचे अपहरण करून मध्यप्रदेशात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ व बाभूळगाव तालुक्यातील दोन मुलींची शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने तब्बल सात महिन्यानंतर सुटका करून दोन आरोपींना अटक केली आहे. शहरालगतच्या नागपूर मार्गावरील सूतगिरणीत कामाला असलेल्या दोन मुलींचे गेल्या वर्षी २१ जुलै रोजी अपहरण झाले होते. याप्रकरणी नागपूर मार्गावरीलच एका गावातील प्रियंकाच्या (काल्पनिक नाव) वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रियंकाची मैत्रीण दीपिकाविरूद्ध (काल्पनिक नाव) गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र पोलीस तपासामध्ये या प्रकरणात अपहरण आणि विक्री करून जबरदस्ती लग्न लावून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपींची संख्या अधिक असली, तरी पहिल्या टप्प्यात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यात प्रियंकाशी जबरीने लग्न करणारा महेश गोविंद कसेरा (२५), दीपिकाशी लग्न करणारा मनोज बन्सीलाल कसेरा (२३) दोघेही रा.तारना जि.उजैन मध्यप्रदेश यांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना सूतगिरणीतील एक कामगार महिलाही मुलींसोबत बेपत्ता होती. पोलिसांनी सर्वप्रथम तिचा शोध घेतला आणि त्यातून अपहरण, विक्री आणि जबरदस्ती लग्न लावणे, हा प्रकार उघडकीस आला. जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींचे जबरदस्तीने अपहरण करणारी ही टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या गुन्ह्याचा तपास शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर व त्यांची चमू करीत आहे. अपहरण केलेल्या प्रियंका आणि दीपिकाला तरना येथे डांबून ठेवण्यात आले होते. त्यांच्याशी लग्न केलेल्या युवकांकडून जबरदस्ती संबंध प्रस्तापित करण्यात आले. यात दीपिका ही सहा महिन्यांची गर्भवती आहे. प्रियंकाशी लग्न करणारा हलवाईचे काम करीत होता, तर दीपिकासोबत लग्न करणारा त्या भागात गांज्याची तस्करी करणारा असल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. दोघींनाही घरकामात व्यस्त ठेवले जात होते. त्यांना सातत्याने धमकावण्यात येत होते. पैसे देवून खरेदी केले आहे, सुटका करण्यासाठी पैसे परत करा, असेही आरोपींकडून त्यांना सांगितले जात होते. यामुळे भयग्रस्त मुली आई-वडिलांशी संपर्कही करू शकल्या नाही. या गुन्ह्यात आणखी पाच ते सात आरोपींचा सहभाग असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. कारवाईत जमादार विनायक राऊत, गजानन दूधकोहळे, सुधीर पिदूरकर, नितीन पंचबुद्धे यांचा समावेश आहे. (कार्यालय प्रतिनिधी) दीपिका वर्षभरापासून घराबाहेर दीपिका बाभूळगाव तालुक्यातील असून तिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. मात्र वडील व्यसनाधीन व आई आजारी असल्याने तिने सूतगिरणीत कामाला जाणे सुरू केले. ती सूतगिरणी लगतच्याच परिसरात राहात होती. मागील वर्षभरापासून ती घरी गेली नाही. तिच्या अपहरणाची माहितीसुद्धा आई-वडिलांना नव्हती. सोबत असलेल्या प्रियंकाच्या वडिलाने तक्रार दिल्यामुळे तिची सुटका झाली. गर्भवतीपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न जबरदस्तीच्या लग्नातून दीपिका गर्भवती आहे. तिची लादलेल्या लग्नातून सुटका झाली असली, तरी आता तिच्या पोटात सहा महिन्यांचे बाळ आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य, पाठीशी कोणीच नाही, अशा स्थितीत पोटातील बाळ व स्वत:चे उदरभरण कसे करायचे, असा प्रश्न दीपिकापुढे आहे. पोलिसांनी दीपिकाला काही शासकीय मदत देता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
दोन अपहृत युवतींची सात महिन्यानंतर सुटका
By admin | Updated: January 16, 2017 00:58 IST