शेतकरी अनभिज्ञ : बंदी घातलेल्या बियाण्यांची खरेदी, दोन हजार बॅगची शोधमोहीम सुरू लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कृषी विभागाने बंदी घातलेल्या बीट कपाशी ‘राशी ६५९’ वाणाचे सव्वा कोटींचे बियाणे जिल्ह्यात जप्त करण्यात आले. मात्र या बियाण्याबाबत आत्तापर्यंत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हे बियाणे खरेदी केल्याचा अंदाज आहे. राज्याच्या कृषी गुणनियंत्रण विभागाने कपाशीच्या बीटी राशी ६५९ या वाणावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असल्याने बंदी घातली आहे. त्यावरून जिल्ह्यातही हे बियाणे विकण्यास बंदी घालण्यात आली. तसे निर्देश सर्व कृषी केंद्र संचालकांना देण्यात आले. असे बियाणे आढळल्यास ते जप्त करण्याची मोहीम कृषी विभागाने हाती घेतली आहे. जिल्ह्यात तूर्तास या वाणाच्या १५ हजार बॅग विक्रीस आल्या आहेत. त्याचा शोध घेण्याची मोहीम कृषी विभागाने बुधवारपासून सुरू केली. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यातील १६ तालुक्यात कृषी विभागाच्या पथकाने या वाणाची तपासणी सुरू केली. त्यात या पथकाला राशी ६५९ वाणाच्या १३ हजार बॅग आढळून आल्या. या बॅग सील करून कृषी केंद्र चालकांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले. तथापि आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी या बंदी घातलेल्या काही बियाण्याची खरेदी केली असण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यात आलेल्या १५ हजार बॅगपैकी अद्याप दोन हजार बॅग आढळून आल्या नाहीत. शेतकऱ्यांची यादी तयार करणार हे बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी तयार करून पाठविण्याचे आदेशही कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. त्यानुसार गुणवत्ता नियंत्रण विभागाने अशा शेतकऱ्यांच्या नावाची यादी तयार करण्याचे कामही आता हाती घेतले. यातून किती शेतकऱ्यांनी हे वाण खरेदी केले, याची माहिती मिळू शकणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना जागृत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना या वाणाच्या बंदीबाबत माहितीच मिळू शकली नाही, ते या बियाण्याची लागवड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर संकट कोसळण्याची शक्यता बळावली आहे.
सव्वा कोटींची कपाशी बियाणे जप्त
By admin | Updated: May 13, 2017 00:22 IST