नांदेपेरा : निसर्गाची अवकृपा तसेच अन्य गोष्टींमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे़ प्रदूषणामुळे राजूर भागातील शेतजमीन नापिक झालेली आहे़ ही शेतजमीन मानवी कृत्यामुळे नापिक झालेली असतानाच आता निसर्गाने देखील शेतकऱ्यांवर अवकृपा केली. सततच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ढगाळ वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी आदी आजारांत वाढ झाली आहे़ बदलत्या हवामानाचा सर्वच क्षेत्रावर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे़ हवामानाच्या अनिश्चिततेमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे़ खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दिलेला दगा, तसेच रबी हंगामात सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले उत्पादनही गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, अवेळी पावसामुळे शेती व्यवसायाला फटका बसत आहे़ आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळे पुन्हा आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे़ ढगाळ वातावरण व पावसामुळे तूर, हरभरा, गहू यासह अन्य पिकांना फटका बसला आहे़ रोगट हवामानामुळे पिके खराब व्हायला सुरूवात झाली आहे़ ढगाळ हवामानामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावली आहे. सूर्याचे दर्शन् दुर्लभ झाले आहेत. त्यामुळे पिकावर रोगराई वाढण्याचा धोका वाढला. अकाली पडणाऱ्या पावसामुळे तूर, गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे़ (वार्ताहर)
बदलत्या हवामानामुळे शेतकरी अडचणीत
By admin | Updated: January 3, 2015 23:10 IST