यवतमाळ : कुठलाही गुन्हा लालचेपोटीच केला जातो. सराईत गुन्हेगार शिक्षेच्या परिणामालाही भीत नाही. मात्र येथील सेमिनरी ले-आऊटमध्ये भरदिवसा पडलेल्या सिनेस्टाईल दरोड्याला अंधश्रद्धेसह अनेक पदर आहे. यात उच्चशिक्षित आणि शासकीय नोकरीत जाणाऱ्या तरुणांचाही समावेश आहे. केवळ अंधश्रद्धेपोटी आपणाला काहीच होणार नाही, या भ्रमात टवाळखोर मित्रांच्या नादी लागून दरोडा घालण्याचे धाडस दरोडेखोरांनी केले. पोलिसांनी अटक केलेले दरोडेखोर नागपुरातील जरीपटका परिसरातील आहे. या भागात गुन्हेगारांमध्ये ‘छपरी’ लावून दरोडा टाकणे प्रचलित आहे. त्यासाठी काही स्वयंघोषित महाराजांनी आपले दुकान थाटले आहे. सेमिनरी ले-आऊटच्या गुन्ह्यातही त्रिलोक पांडुरंग पाटील (४७) आणि देवेंद्र जयदेव खापरे (२७) या दोघांनी आपण ‘छपरी’ लावून दरोडा टाकल्यास घरमालकाला ‘वश’ करून मुद्देमाल मिळविता येतो, असे सांगितले. यावर अंधविश्वास ठेऊन ४० कोटींच्या लालचेपोटी कुणाल उर्फ मोनू प्रकाश रामटेके (३२) या पुणे विद्यापीठाची एमबीएची पदवी घेतलेल्या बेरोजगार युवकाने सहभाग घेतला. त्याच प्रमाणे सचिन उर्फ मनीष रवी गावंडे यालाही शासकीय नोकरीची आॅर्डर आली आहे. तरही केवळ अंधश्रद्धेतून त्यांनी दरोड्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. ही बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. धक्कादायक बाब म्हणजे या दरोड्याच्या मास्टर मार्इंड महिला आहेत. यातील इमली उर्फ प्रिया रामचरण यादव (२२) रा. पार्डी नागपूर हिला पोलिसांनी सोमवारी अटक केली. तिच्यासोबत आणखी एका महिलेचा समावेश आहे. ज्यांच्याकडे दरोडा पडला त्या अनिल खिवंसरा यांच्या विश्वासातील मोलकरीण प्रेमिला भीमराव मडावी (४५) रा. वंजारीफैल यवतमाळ हिचा सहभाग आहे. प्रेमिलानेच खिवंसरा यांच्याकडे ४० कोटीची रक्कम असल्याचे तिच्या नवऱ्याला सांगितले. गवंडी काम करणाऱ्या भीमराव मडावी (४८) याने याची माहिती कळंब येथील मित्र लक्ष्मण ढाले (४०) याला दिली. लक्ष्मण हा इमली यादव हिच्या संपर्कात होता. इमलीने आपल्या मैत्रणीच्या माध्यमातून दरोड्याचा कट रचला. त्यासाठी २५ सप्टेंबर रोजी भीमराव मडावी याने आपल्या दुचाकीवरून खिवंसरा यांचे घर दाखविले. त्यानंतर जादुटोणा करण्यासाठी देवेंद्र आणि त्रिलोक यवतमाळात आले. घटनेच्या दिवशी या दोघांनी वाहनातूनच ‘छपरी’ (घरातील व्यक्तीला वश करणे) लावत असल्याचे सांगितले. मात्र ऐनवेळी छपरी लागत नसल्याची सबब पुढे करून सरळ घरात शिरण्याचा सल्ला दिला. यावरून चौघांनी घरात शिरुन दरोडा घातला. मात्र मुद्देमाल हाती लागला नाही. यावरून नंतर दरोडेखोरांमध्ये आपसात वादावादी झाली. अंधश्रद्धा आणि चुकीच्या संगतीमुळे या गुन्ह्यात कुणाल, सचिन यांच्या सारखे नवखेही अडकले. (कार्यालय प्रतिनिधी) मोलकरीण म्हणाली, मलासुद्धा बांधून जा ४अनिल खिवंसरा यांच्या घरी दरोडा पडला तेव्हा घरात घरमालकीणसह मोलकरीण प्रेमिला मडावी होती. घरात शिरलेल्या दरोडेखोरांना मोलकरीण प्रेमिलाने बेडरुममधील कपाट दाखविले. जाताना आरोपी खिवंसरा यांची पत्नी निर्मला यांच्या अंगावरचे दागिने काढणार असताना प्रेमिलानेच त्यांना रोखले. आता मलासुद्धा बांधून ठेवा, अशी सूचना केली. त्यावरून दरोडेखोरांनी प्रेमिलाला बांधून ठेवले. या गडबडीत मात्र एअरगन असलेली कॅरीबॅग तिथेच विसरले आणि यातून दरोडेखोरांचा सुगावा लागला. दरोडेखोरांना चार दिवसांची कोठडी ४रविवारी पहाटे अटक केलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले. या आठही दरोडेखोरांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील मास्टर मार्इंडचा पोलीस शोध घेत आहे. आणखी चौघांना अटक ४गुन्ह्यात सुरुवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात असलेली मोलकरीण प्रेमिला भीमराव मडावी (४८) आणि तिचा पती भीमराव मडावी, इमली उर्फ प्रिया रामचरण यादव (२२) रा. पार्डी नागपूर, लक्ष्मण ढाले (४०) रा.कळंब यांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.
दरोडेखोरांना छपरी जादुटोण्याची भुरळ
By admin | Updated: October 4, 2016 02:08 IST