जिल्हा परिषद : दोन दिवसांत आदेश धडकणार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्या बदलीचे आदेश धडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाने ३१ मे पूर्वीच सर्व बदल्या पूर्ण करण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली. आता केवळ शिक्षकांच्या बदल्या होणे बाकी आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांपाठोपाठ अधिकाऱ्यांनाही बदलीचे वेध लागले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बदली आदेशाची प्रतीक्षा आहे. मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांची मुंबईला बदली झाल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप त्यांचे बदली आदेश धडकले नाही. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्यचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीसुद्धा बदलीस पात्र आहे. पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डीआरडीएचे प्रकल्प संचालक आदींनीही विनंती बदलीसाठी रेटा लावला आहे. डीआरडीएमध्ये नव्यानेच एक सहायक गटविकास अधिकारी बदलून येणार आहे. येथून बदलून जाणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागीही नवीन अधिकारी रुजू होणार आहे. या बदल्यांमुळे नवीन पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही नवीन राहणार आहे. यामुळे प्रशासनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रतिनियुक्त्या केल्या रद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायत आणि बांधकाम विभागातील प्रतिनियुक्त्या रद्द केल्या. गेले काही दिवस अनेक कर्मचारी बदली होऊनही प्रतिनियुक्तीच्या नावाखाली पंचायत आणि बांधकाममध्ये ठाण मांडून होते. काहींची बदली होऊनही त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. आता सीईओंना एका झटक्यात प्रतिनियुक्त्या रद्द करून मुक्कामी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी रवाना केले आहे. पाणी पुरवठा विभाग वाऱ्यावर जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग काही महिन्यांपासून वाऱ्यावर आहे. कार्यकारी अभियंत्यांची बदली झाल्याने प्रभारावरच उन्हाळ्यातील पाणी टंचाई निवारली जात आहे. अद्याप या विभागाला कार्यकारी अभियंता मिळालाच नाही. त्यामुळे पाणी टंचाईच्या उपाययोजनांबाबत शासन, प्रशासन गंभीर नसल्याचे स्पष्ट होते.
अधिकाऱ्यांना बदलीचे वेध
By admin | Updated: May 17, 2017 00:48 IST