लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षांवरील नाट्यमय अविश्वास प्रस्तावापासून चांगलीच चर्चेत आली आहे. संचालक मंडळाने सोमवारी झालेल्या बैठकीत यापूर्वी घेतलेले बदल्या, समित्यांचे निर्णय रद्द केले. नोकर भरतीसाठी नव्याने उपसमिती नेमण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या घडामोडीत नेमके दबावतंत्र कुणाचे, याची चर्चा सहकार वर्तुळात रंगली आहे.
अध्यक्ष मनीष पाटील यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी जिल्हा बँकेत संचालक मंडळाची बैठक झाली होती. यावेळी बदली प्रक्रियेचा निर्णय घेण्यासोबतच कर्ज, बांधकाम, कार्यकारी, स्टाफ, गुंतवणूक, वसुली, ऑडिट, सायबर आदी समित्यांचे गठण करण्यात आले होते. त्यानंतर काही संचालकांत कुजबुजही सुरू झाली होती. दरम्यान जिल्हा बँकेत आज सोमवारी दुपारी एक वाजता संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र ही बैठक तब्बल तीन तासांनंतर म्हणजेच दुपारी चार वाजता सुरू झाली. यावेळी गत बैठकीत घेण्यात आलेले बदल्या, समित्यांचे निर्णय रद्द करण्यात आले. अध्यक्षांनी विश्वासात न घेतल्याने दोन्ही उपाध्यक्ष नाराज होते.
त्यातूनच विश्वासात घेऊन नव्याने समित्या गठण करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. नोकर भरतीसाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीत आ. संजय देरकर, वसंतराव घुईखेडकर, राजूदास जाधव, प्रकाश पाटील देवसरकर, प्रा. टीकाराम कोंघरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
९५ शाखा जिल्ह्यात असून तेथेही ऑडिटची मागणी आहे.हिवरासंगम, दिग्रस, जांब बाजार शाखेप्रमाणेच उर्वरित सर्व शाखांचे स्पेशल ऑडिट करून गैरप्रकार असल्यास कारवाईची मागणी आहे.
दारव्हा मार्गावर बैठकीपूर्वी बैठकजिल्हा बँकेत संचालक मंडळाची बैठक एक वाजता नियोजित होती. परंतु, १४ ते १५ संचालक मंडळ दाव्हा मार्गावर बैठकीला हजर होते.या ठिकाणी संचालकांनी 3 खासदार, आमदार व उपाध्यक्षांसमक्ष अध्यक्षांविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. तसेच बदल्या, समित्यांचा निर्णय रद्द करून नोकर भरतीसाठी समिती नेमावी, अशी भूमिका संचालकांनी मांडली.त्यानंतर बँकेच्या पदाधिकाऱ्यांनाही याच ठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यानंतर बँकेत बैठक होऊन निर्णय झाल्याचे ऐकायला मिळत आहे.
जांब बाजार शाखेतील भ्रष्टाचार गाजलापुसद तालुक्यातील जांब बाजार शाखेत पाच कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. ही बाब प्राथमिक चौकशीत उघड देखील झाली. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा भ्रष्टाचार चांगलाच गाजला. ऑडीट रिपोर्ट आल्यानंतर संबंधित दोषींवर गुन्हे दाखल केले जाईल, असे सांगण्यात आले.
१० महिने अवधी विद्यमान संचालकांकडे शिल्लक आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेत पदभरतीतून सर्वांनाच मोठी अपेक्षा असते. या संचालक मंडळाला आता शेवटचे दहा महिने शिल्लक राहिले आहेत. त्याआधी पदभरतीची प्रक्रिया व्हावी यासाठी धडपड सुरू झाली आहे. शासन स्तरावरून पदभरतीला मान्यता मिळाल्यास जवळपास १६० जागांची भरतीप्रक्रिया राबविता येणार आहे. संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा कार्यक्रम व्हावा यासाठीही प्रयत्न केले जात आहे.