यवतमाळ : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून शहरी भागात नागरी माता बाल संगोपन कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कार्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना एप्रील २०१४ पासून वेतनच देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अडेलतट्टू धोरणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. शहरात तीन नागरी आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. यावर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, क्लार्क, नर्स, शिपाई अशी कंत्राटी पदे मंजूर आहेत. एकूण ५० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून ते कंत्राटी कर्मचारी विना वेतनच राबत आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकूण घेण्यासाठी कुणीच तयार नाही. जिल्हा शल्यचिकित्सकाकडे दाद मागितली असता थेट कामावरून काढूण टाकण्याच्या धमक्या मिळतात अशी खंत कर्मचाऱ्यांनी खासगीत व्यक्त केली आहे. कंत्राटी नोकरी असल्याने या अन्यायाविरोधात कोणताच कर्मचारी उघडपणे बोलण्यास तयार नाही. या कर्मचाऱ्यांना वेतन न देता राबवून एक प्रकारे त्यांचे शोषण केले जात आहे. नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र संवेदना हरविलेल्या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी कुठलेच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)
कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
By admin | Updated: February 2, 2015 23:13 IST