वणी : झरीजामणी तालुक्यातील चिचघाट, पवनार, अडकोली, खडकडोह व वणी तालुक्यातील बोपापूर, गोडगाव, घोन्सा, बोर्डा, मोहोर्ली परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे़ गेल्या महिन्यात गोडगाव-इजासन येथील एका वृध्देला वाघाने ठार केल्याने शेतकरी व मजुरांमध्ये अद्याप धास्तीचे वातावरण दिसून येत आहे.या दोनही तालुक्यात घनदाट वनसंपदा आहे. जंगली परिसर मोठा आहे. या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. काल सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास झरी-घोन्सा-पाटणच्या बस चालकाला घोन्सानजीक पुलावर या वाघाचे दर्शन घडले. त्यावेळी बसमधील प्रवाशांनीही वाघाला बघण्यासाठी धडपड चालविली होती. गेल्या दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील घोन्सा परिसरात सायंकाळच्या सुमारास महिला शेतमजुरांना या वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये पुन्हा एकदा वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे़गेल्या दीड वर्षांपूर्वी वणी तालुक्यातील बोपापूर येथील संजय जंगले या युवकाला वाघाने ठार केले होते. त्यानंतर वाघाला लवकरच जेरबंद करण्याचे आश्वासन वन विभागाने दिले होते़ मात्र वन विभागाला अद्यापही वाघ गवसला नाही़ गेल्या महिन्यात बोपापूरलगतच असलेल्या गोडगाव शिवारात जिजाबाई दादाजी बलकी या ५८ वर्षीय महिलेला वाघाने जागीच ठार केले. त्यावेळी ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठा वाद उफाळला होता. हा वाद शमविण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देऊन केवळ वेळ मारून नेली. त्यामुळे वन विभागाविरूध्द ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या परिसरात वाघाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतमजूरही शेतात जायला घाबरत आहेत. या परिसरात दररोज कुठे तरी, कुणाला तरी वाघाचे दर्शन घडत आहे़ त्यामुळे या परिसरातील शेतकरी व मजूर वाघाच्या दहशतीत वावरत आहे़ आधीच कोरड्या दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाघानेही हैराण करून सोडले आहे. वन विभागाच्या पोकळ आश्वासनावर गावकऱ्यांनी विश्वास ठेवला होता़ मात्र वन अधिकारी, कर्मचारी आता या परिसराकडे फिरकतानाही दिसत नाही़ त्यामुळे कोरड्या दुष्काळाच्या सावटात सापडलेले शेतकरी वाघाच्या दहशतीने हादरले आहेत. शेतकरी आणि मजुरांना शेतात जावे की नाही, असा प्रश्न सतावत आहे़ याकडे लक्ष देऊन वन विभागाने वाघाला त्वरित जेरबंद करावे, अशी या परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांची मागणी आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)
वणी, झरी तालुक्यात वाघाची दहशत
By admin | Updated: February 12, 2015 01:52 IST