चौघे अटकेत : शस्त्र जप्तीची टीप दिल्याच्या संशयावरून घटना यवतमाळ : दुर्गा विसर्जनाच्या अखेरच्या टप्प्यात तिघांच्या खुनाची घटना घडल्याने येथील पोलीस दलही चांगलेच हादरले आहे. मात्र एका विशिष्ट भागातील विशिष्ट गटापुरतीच ही खुना-खुनी असल्याने आणि त्याचे लोण इतरत्र पसरण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने पोलीस तसे काहीसे रिलॅक्स आहेत. यवतमाळच्या गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांच्या संघटित गुन्हेगारीच्या कारवाया संपूर्ण विदर्भातच चर्चेचा विषय राहिल्या आहेत. अमरावती सारख्या विभागीय मुख्यालयीसुद्धा अशा गुन्हेगारी टोळ्या आता नाहीत. तेथे प्रॉपर्टीशी संबंधित अर्थात चोरी-घरफोडीच्या गुन्ह्यांची संख्या प्रचंड आहे. तर यवतमाळात संघटित गुन्हेगारीमुळे शरीरासंबंधीच्या गुन्ह्यांची संख्या नेहमीच वाढलेली पहायला मिळते. येथे आता प्रमुख दोन मोठ्या टोळ्याच नव्हे तर अनेक गल्लीबोळांमध्ये ‘भाई’ तयार झाले आहेत. त्यांच्याही लहान सहान टोळ्या आहेत. या टोळ्या कुठे ना कुठे मोठ्या टोळ्यांच्या फॉलोअर आहेत. यवतमाळात शनिवारी रात्री मच्छीपूल भागातील रविदासनगरात मो.इकबाल मो. जब्बार, मो.जावेद ऊर्फ कालू मो. जब्बार आणि दुसऱ्या गटातील शेख इरफान शेख रमजान ऊर्फ बबलू या तिघांचा दोन गटांतील भांडणात खून झाला. तिहेरी खुनाच्या या घटनेने पोलीसही चांगलेच हादरले. या खुनांचा शहरातील गुन्हेगारी टोळ्या व संघटित गुन्हेगारीच्या कारवायांवर काय परिणाम होतो याचा अंदाज पोलिसांनी घेतला. मात्र प्रत्यक्षात तीनही मृतक एकाच समाजाचे असल्याने तिहेरी खुनाची ही घटना व त्याचा तणाव बालाजी चौक ते मच्छीपूल एवढ्याच भागात पहायला मिळाला. दोघांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप नगराध्यक्षाच्या भावासह तिघांवर ठेवला गेल्याने या खुनाची शहरभर चर्चा झाली, एवढेच. वास्तविक या तीनही खुनांचा व्यापारपेठेत कुठेच काहीच परिणाम जाणवला नाही. अनेकांना तर तिहेरी खुनाची ही घटनाही माहीत नसल्याचे पहायला मिळाले. शनिवारी बबलूकडून इकबालच्या कुटुंबातील सदस्याला शिवीगाळ झाल्याच्या घटनेने या वादाची ठिणगी पडली. आधी बबलूचा खून झाला. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी इकबाल व साथीदारांवर हल्ला चढविला. त्यात इकबाल व त्याचा भाऊ जावेद या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात राय परिवारातील तिघांची नावे इकबाल व जावेदच्या खुनाचा कट रचल्याच्या आरोपात तक्रारीत नमूद करण्यात आले. वास्तविक त्यांचा या खुनाशी थेट संबंध नाही किंवा ते घटनास्थळीही नव्हते ही बाब सर्वश्रृत आहे. पोलिसातील तक्रारीतही ते नमूद करण्यात आले. एकाच समाजाच्या दोन गटांतील वैयक्तिक भांडणात तिघांना जीव गमवावा लागला. त्याचे लोण पसरु नये, या प्रकरणाला वेगळे वळण मिळू नये, याची खबरदारी पोलीस घेत असून त्या दृष्टीने आवश्यक तेथे तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी) अनेक महिन्यांपासून धुमसत होता वादतिहेरी खुनातील या दोनही गटांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद धुमसत होता. पोलिसांनी इकबालच्या एका घरावर धाड घालून काही शस्त्रे जप्त केली होती. तेथे मोठ्या प्रमाणात घातक व अग्निशस्त्रे असल्याची टीप मिळाल्यावरून यवतमाळ शहर ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने ही यशस्वी कारवाई केली होती. ही टीप शेख इरफान उर्फ बबलूने दिली असावी, असा समज झाल्याने इकबाल व साथीदारांनी त्याला शिवीगाळ केली होती. त्याबाबत त्याने धमकीची तक्रार शहर पोलिसात नोंदविली. तेथूनच हा वाद पेटला.
तिघांच्या खुनाने पोलीसही हादरले
By admin | Updated: October 26, 2015 02:20 IST