मारहाण प्रकरण : पुसद न्यायालयाचा निर्णयपुसद : एका महिलेसह दोघांना काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी दोष सिद्ध झाल्याने पित्यासह तीन मुलांना एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्याचा निकाल येथील न्यायदंडाधिकारी अभिजीत देशमुख यांच्या न्यायालयाने दिला. किसन चंद्रभान काळे, लोभाजी किसन काळे, हनुमान किसन काळे, शिवाजी किसन काळे सर्व रा. चिलवाडी, ता. पुसद अशी आरोपींची नावे आहेत. चिलवाडी येथील अन्नपुर्णा विनोद कवडे यांनी शेतात सोयाबीन काढून ठेवले होते. २१ आॅक्टोबर २००९ रोजी दुपारी ३.३० वाजता या चौघांनी या शेतात जाऊन सोयाबीन घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अन्नपुर्णाचा भासरा राजू कवडे याने आरोपींना तुम्ही शेतात का आले अशी विचारणा केली. त्यावेळी या चौघांनी राजू कवडे व अन्नपुर्णा कवडे यांना मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सरकारी वकील अॅड़ ओमप्रकाश मेंढे यांनी युक्तीवाद केला. आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने एक महिन्याचा कारावास, प्रत्येकी दो हजार रुपए दंड अशी शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)
पित्यासह तीन मुलांना कैदेची शिक्षा
By admin | Updated: August 4, 2014 23:58 IST