पांढरकवडा : पांढरकवडा येथे जप्त केलेल्या सहा लाख रुपयांच्या अवैध वृक्षतोड प्रकरणी यवतमाळ तालुक्यातील हिवरीच्या तिघांना शनिवारी अटक करण्यात आली. रूपेश मानकर, नारायण वामन राऊत व रामेश्वर विष्णू मडावी सर्व रा. हिवरी अशी या वन गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. रूपेश हा सागवानाचा दलाल तर नारायण व रामेश्वर हे प्रत्यक्ष वृक्षतोड करणारे मजूर आहेत. त्यांच्यासह यापूर्वी अटक झालेल्या दोघांनासुद्धा न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. पांढरकवडा आरएफओच्या पथकाने शनिवारी हिवरीतून तिघांंना अटक केली. त्यांनी वृक्षतोड केलेले पिंपरी (ईजारा)चे जंगल दाखविले. तेथे १०१ परिपक्व वृक्षांची तोड झाली आहे. त्यात ५३ वृक्ष आदिवासींच्या तर ४८ वृक्ष महसुली जमिनीवरील आहेत. हिवरीत आरोपींच्या अटकेची कारवाई करणाऱ्या पांढरकवड्याच्या वन पथकामध्ये आरएफओ बाबाराव मडावी तसेच पी.व्ही. सोनुले, आर.एन. आवे, बी.व्ही. मोहदे, बी.ए. मेश्राम, एन.डब्ल्यू. मस्के, बांगर, महेशकर, धर्मा कोवे, डी.ए. वानखडे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अवैध वृक्षतोडीचा म्होरक्या शेख चाँद याचा वन अधिकारी शोध घेत असले तरी तो फरार राहून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जाते. (तालुका प्रतिनिधी)
ंवृक्षतोडीत हिवरीच्या तिघांना अटक
By admin | Updated: October 19, 2015 00:13 IST