लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रेल्वे मार्गाच्या कामकाजातून उडणारी धूळ थेट पिकांवर साचत आहे. यातूनच या मार्गावरील पिके मातीने माखली आहेत. परिणामी, शेतातील पिकांची वाढ खुंटली आहे. एकरी उत्पादनाला याचा मोठा फटका बसला आहे. कापूस, तूर या खरिपातील पिकांसह रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीसाठी आता जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे कामकाज सुरू आहे. या रेल्वे मार्गावर असलेल्या तिवसा या गावाजवळील शेतशिवारातील शेतकऱ्यांना चालू असलेल्या माती कामाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतशिवारात काम करणेही शेतकऱ्यांना अडचणीचे झाले आहे.
झालेले नुकसान महसूल अथवा रेल्वेने भरून द्यावे
- शेतकऱ्यांच्या आर्थिक १ नुकसानीला महसूल आणि रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांच्या शेतशिवारात झालेल्या नुकसानीची भरपाई रेल्वे प्रशासनाने अथवा महुल प्रशासनाने द्यावी, अशी विनंती राजेश राठोड, कैलास राठोड, अविनाश जाधव आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
- मागणीची पूर्तता व्हावी म्हणून यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अजूनपर्यंत या मागणीकडे शासकीय यंत्रणेकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही.
- रेल्वे मार्गाच्या बाजूला अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती आहे. त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. सतत उडणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. आदा कुटुंब चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.