विशाल सोनटक्के
यवतमाळ : पिढ्यान् पिढ्या कित्येक शतकापासून आपण रामनाम घेत आलो, रामनाम घेतच मोठे झालो. रामनाम ऐकल्यानंतर सहस्त्रनाम ऐकण्याइतके पुण्य मिळते. रामकथेत जीवनाचे जे मूल्य सांगितले आहे, ते तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही. त्यातही रामकथा जेव्हा बापूंच्या तोंडून ऐकतो, तेव्हा त्या आनंद आणि अर्थामुळे आपला संपूर्ण जीवनमार्ग प्रशस्त होतो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
चिंतामणी बाजार समितीच्या आवारात आयोजित रामकथा पर्व सोहळ्याच्या आठव्या दिवशी शनिवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध आध्यात्मिक संत मोरारी बापू यांच्या व्यासपीठाच्या साक्षीने ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावरील ‘पेन ॲन्ड पर्पज’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा रामकथा पर्वचे यजमान डॉ. विजय दर्डा, लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके उपस्थित होते.
भगवान श्रीरामाने ज्या प्रकारे मर्यादांचे पालन केले, त्यात त्याग आहे, तप आहे, तेज आणि अनुशासनही आहे. या सर्व प्रकारच्या भावना रामकथेतून अनुभवता येतात. आपण भाग्यवान आहोत, पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम पुन्हा त्या जागी विराजमान झाले, जिथे वर्षानुवर्ष विराजमान होते, अशा भावनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या. आज ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या आयुष्यावरील इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले. बाबूजींचे बालपण, सामाजिक जीवन, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी म्हणून राष्ट्रभावनेतून केलेले कार्य, स्वातंत्र्यानंतर राष्ट्र निर्मितीच्या यज्ञातील त्यांचा सहभाग, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीचे योगदान आदी सर्व पैलूंचा या पुस्तकात समावेश आहे. तसेच आझाद हिंद सेनेतही त्यांनी कार्य केले. सेनेच्या फौजेतल्या वेशातील छायाचित्रही या पुस्तकात आहे. एक नेता जेव्हा स्टेटस्मनचे वर्तन करतो, तेव्हा समाजात कसा बदल होतो, त्याचेही वर्णन आहे. यात बाबूजींचे प्रगतशील विचार दिसून येतात. संग्रहणीय असलेले हे पुस्तक तीन भाषेत आहे. ज्या भाषेत सोईचे वाटेल ते अवश्य वाचा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी अयोध्येची प्रतिकृती मोरारी बापू यांना भेट दिली. तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २०२३ मध्ये भारत सरकारच्या वतीने जारी केलेले १०० रुपयांचे नाणे आणि इंग्रजीतील ‘पेन ॲन्ड पर्पज’ हे पुस्तक बापूंना अर्पण केले. सूत्रसंचालन रामकथा पर्वचे कार्याध्यक्ष कीर्ती गांधी यांनी केले.
‘लोकमत’चे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी : देवेंद्र फडणवीस
डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा हे ‘लोकमत’सह विविध माध्यमातून सातत्याने कार्यक्रम, उपक्रम राबवितात. आध्यात्मिक, सांस्कृतिक, गीत-संगीत तसेच उद्योगाशी निगडित असलेले हे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. ‘लोकमत’ने महाराष्ट्रासह देशातील विविध प्रेरणादायी व्यक्तींना एकत्र आणण्याचे कार्य केले. आज त्यांच्या प्रयत्नांमुळे पूज्य संत मोरारी बापू यांचे दर्शन, आशीर्वाद मिळाल्याच्या भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात दिसतो प्रगतीचा मार्ग : डॉ. विजय दर्डा
पूज्य मोरारी बापू यांच्या रामकथेचे निमंत्रण देण्यासाठी फोन केला असता एक मिनिटही न घेता मी येणार असे देवाभाऊ म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचे जीवन प्रामाणिकपणा, सेवा, विकासाच्या प्रेरणेने परिपूर्ण आहे. त्यांच्या नेतृत्वात राज्याने नवी उंची, ऊर्जा प्राप्त केली. राजकारण हे समाजसेवेचे माध्यम समजून ते कार्यरत असतात. त्यांच्यामध्ये आपल्याला प्रगतीचा मार्ग दिसतो, असे गौरवोद्गार डॉ. विजय दर्डा यांनी काढले. श्रद्धेय बाबूजींच्या जीवनावरील हे पुस्तक मराठी व हिंदीमध्ये यापूर्वीच आल्याचे ते म्हणाले.
पुस्तक लोकार्पण नव्हे, हे तर ब्रह्मार्पण : मोरारी बापू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे येऊन या व्यासपीठाप्रती आपला सन्मान, सद्भाव व्यक्त केला. माझ्या व्यासपीठावरून मी राजपीठाला शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्याला हनुमानजी संपूर्ण बळ प्रदान करो, त्या बळाचे फळ महाराष्ट्रातील शेवटच्या जनतेपर्यंत पोहोचो, अशी भावना व्यक्त करीत बाबूजींच्या पुस्तक प्रकाशन घटनेला मोरारी बापू यांनी वंदन केले. शब्द म्हणजे ब्रह्म, म्हणूनच या पुस्तकाचे प्रकाशन केवळ लोकार्पण नव्हे तर ब्रह्मार्पण आहे, असेही मोरारी बापू यावेळी म्हणाले.