अविनाश साबापुरे/रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहिदाचे स्मारक म्हणजे केवळ वास्तू नव्हे, ते भारतीय स्वातंत्र्याचे मंदिर आहे... असा जाज्वल्य अभिमान व्यक्त करतात उमरीचे गावकरी. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात महात्मा गांधीच्या प्रेरणेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान देणाऱ्या यशवंत लुडबाजी पाळेकर यांचे स्मारक या गावात गेल्या ३९ वर्षांपासून आझादीचा ओजस्वी हुंकार भरत आहे. ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने बाभूळगाव तालुक्यातील या शहीद स्मारकावर एक कृतज्ञतापूर्वक नजर...९ ऑगस्ट १९८१ रोजी या स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. चार दशकांचा दीर्घ काळ लोटूनही हे स्मारक तेवढेच प्रेरक आहे. वर्षागणिक स्मारकाचा परिसर अधिक देखणा केला जात आहे. गेल्या वर्षी महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्त येथे वन विभागाने विशेष उपक्रम राबविला. १९३६ मध्ये गांधीजींनी सेवाग्रामच्या आश्रमात जो पिंपळवृक्षा लावला होता, त्यापासून रोप तयार करून वृक्षलागवड करण्यात आली. त्यामुळे या हुतात्मा स्मारकाला आता राष्ट्रपित्याच्या स्मृतींचीही सावली लाभणार आहे.बॅरिस्टर ए.आर.अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात हुतात्मा स्मारकांच्या बांधणीची संकल्पना पुढे आणली. त्यातून २०२ ठिकाणी बांधकामे पूर्ण झाली. त्यातीलच एक आहे बाभूळगाव तालुक्यातील उमरीचे स्मारक. काळाच्या ओघात अनेक ठिकाणच्या स्मारकांवर स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. अनेक स्मारकांच्या इमारती मोडकळीस आल्या. मात्र उमरीचे स्मारक दिवसेन्दिवस अधिकाधिक देखणे होत आहे. यामागे जिल्हा परिषदेची धडपड जेवढी कारणीभूत आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे उमरी गावकऱ्यांमध्ये ठासून भरलेली राष्ट्रीयतेची भावना.मी शहीद स्मारकभारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे, ९ ऑगस्ट क्रांती दिन... स्वातंत्र्यासाठी १९४२ चा अखेरचा लढा. महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला. ‘करेंगे या मरेंगे’च्या गगनभेदी घोषणेने अख्खा देश पेटून उठला. या आंदोलनात लाखो तरुणांनी सहभाग नोंदविला अन् बघता बघता सारा देशच जणू तुरुंग झाला. परंतु ९ ऑगस्टला देशात विविध ठिकाणी जनक्षोभ भडकला. या आंदोलनात अनेक वीरांनी प्राणाची पर्वा न करता ब्रिटिश सरकारविरोधात बंड पुकारले. अनेकांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्याच स्मरणार्थ प्रत्येक जिल्ह्यात शहीद स्मारके उभारण्यात आली. आज क्रांती दिनानिमित्त या स्मारकांच्या अवस्थेवर प्रकाश टाकणारे हे वृत्त...
हे तर स्वातंत्र्याचे मंदिर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST