यवतमाळ : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेलाच करावे, असा शासन आदेश असतानाही जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक अजूनही वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे वेतनाच्या आदेशाचा जिल्ह्यात खेळखंडोबा झाला आहे.विशेषत: खासगी संस्थांच्या शाळांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत नियमितपणे केले जात आहे. वेतन महिन्याच्या एक तारखेस अदा न केल्यास शिक्षणाधिकारी किंवा वेतन पथकावर कारवाई करण्याचे आदेश आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे वेतन अर्धा महिना उलटून गेल्यावरही झाले नाही. तरी कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून अडले होते. हे शिक्षक वेतन अधीक्षकांच्या कार्यालयात धडकताच, लगेच तिसऱ्या दिवशी त्यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. यावरून वेतन अदा करण्याच्या बाबतीत ‘विशिष्ट टेबल’वर जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. या खेळखंडोब्याला कंटाळून अखेर शिक्षक संघटनांनी आॅनलाईन ऐवजी आॅफ लाईनच वेतन देण्याची मागणी लावून धरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शिक्षकांच्या वेतनाचा खेळखंडोबा कायमच
By admin | Updated: September 27, 2015 01:57 IST