फुलसावंगी : तब्बल अडीच वर्षांपासून पाठ फिरविणाऱ्या एका शिक्षकावर महागाव शिक्षण विभाग मेहरबान दिसत आहे. शिक्षक साहेबगिरीच्या अविर्भावात वागत असून शिक्षण विभागाने त्याचे अडीच वर्षांपासून नियमित वेतन काढले आहे. फुलसावंगी केंद्रांतर्गत २०१६ पूर्वी तत्कालिन केंद्र प्रमुख पी.व्ही. जीवने कार्यरत असताना केंद्राचा कारभार सुरळीत होता. टेंभी केंद्र शाळेत कार्यरत त्या शिक्षकाला सुरुवातीपासूनच नेतेगिरीचा मोह होता. आधीपासूनच त्याच्यावर शिक्षण विभाग मेहरबान होते. त्यामुळेच तत्कालिन केंद्र प्रमुख जीवने यांच्या कामकाजावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांच्याकडून फुलसावंगीचा प्रभार काढून घेतला आणि टेंभीच्या शिक्षकाला नियमबाह्य प्रभार देण्यात आला. टेंभी शाळेतून सदर शिक्षक २५ सप्टेंबर रोजी कार्यमुक्त झाले. परंतु अद्यापही केंद्र शाळेत रुजू झाले नाही. या काळात महागाव शिक्षण विभागाने त्यांचे नियमित वेतन काढले आहे. सदर शिक्षकाची बदली आता पुसद पंचायत समितीमध्ये झाली आहे. सदर शिक्षकाला त्याच्या मुख्यालयातून कार्यमुक्त केल्याशिवाय पंचायत समितीस्तरावरून कार्यमुक्त करता येत नाही. तर दुसरीकडे सदर शिक्षक अडीच वर्षांपासून फुलसावंगीचा प्रभारच घेतला नव्हता. टेंभीवरून कार्यमुक्त आणि फुलसावंगीचा प्रभार घेतला नसल्याने आता फुलसावंगी केंद्र शाळेतील मुख्याध्यापकांना सदर शिक्षकाला कार्यमुक्त करावे, असा प्रश्न भेडसावत आहे. महागाव शिक्षण विभाग आता काय निर्णय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ शिक्षकावर महागाव शिक्षण विभाग मेहरबान
By admin | Updated: May 26, 2016 00:14 IST