कर्मचाऱ्याची समाजसेवा : विद्यार्थ्यांचे प्रबोधनआर्णी : आपण आणि आपले कुटुंब एवढ्याच मर्यादेत बहुतांश शासकीय कर्मचारी विचार करतात. परंतु तलाठी असलेले श्याम रणनवरे महाराज हे नोकरीसोबतच संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देतात. बळीराजा चेतना अभियानातही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांसाठी ते प्रभावी प्रबोधन करीत आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाद्वारे बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत रणनवरे महाराजांनी आर्णी, महागाव, दारव्हा, घाटंजी तालुक्यातील शाळा-महाविद्यालय, वस्ती, वाड्यांवर प्रभावीपणे प्रबोधन केले आहे. मागील महिन्यात ते आपल्या नोकरीतील कर्तव्याला कोणतीही बाधा येऊ न देता गावागावांत पोहोचले. ‘स्वप्नाामधील गावा स्वप्नामधुनी जावे’ या शीर्षकांतर्गत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. जगाच्या पोशिंद्याला जगविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. अंधश्रद्धा, व्यसने, जुन्या रुढी, परंपरा आपल्या विकासाला कशा बाधक ठरतात, हे पटवून देत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या विचारांचे विद्यार्थ्यांपुढे दाखले देतात. परिसरातील शेतकरी आत्महत्या का करीत आहेत, त्या रोखण्यासाठी शासन काय करीत आहे आणि ग्रामस्थांनी काय करायला पाहिजे या संदर्भातील त्यांचे विवेचन विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा परिणाम करीत आहे. यापूर्वी त्यांनी दाभडी, आसरा, देऊरवाडा, लिंगी सायखेडा या गावात हागणदारीमुक्तीची चळवळ उभी केली. आता अशाच गावांची बळीराजा चेतना अभियानासाठी त्यांनी निवड केली आहे. दारव्हा तालुक्यातील चांदणी येथे सभापती सुभाष ठोकळ, लाखखिंड येथे माजी सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत रणनवरे यांनी प्रबोधन केले. दारव्हा तालुक्यातील नऊ गावात त्यांच्या व्याख्यानाच्यावेळी गटविकास अधिकारी गुहे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे उपस्थित होते. घाटंजी तालुक्यातील आमडी येथे त्यांचे व्याख्यान झाले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे उपस्थित होते. राळेगाव तहसीलदार गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात जळका येथे त्यांनी मार्गदर्शन केले. आर्णी, महागाव तालुक्यातही त्यांनी जनजागृती केली. पाणी अडवा-पाणी जिरवा, विहीर पुनर्भरण, नाल्याचे सरळीकरण, रुंदीकरण आदी कामांना प्रोत्साहन देण्याचे त्यांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)
बळीराजा अभियानात तलाठी रणनवरे यांचे योगदान
By admin | Updated: March 5, 2016 02:42 IST