जिल्हा प्रशासनाचे आवाहन : पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाणयवतमाळ : पावसाळ्यात दरवर्षी मराठवाड्यासह विदर्भात विजेचा कडकडाट, गारपीट व वादळी वार्यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित्व व वित्त हानी होते. ही हानी टाळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी स्वत: सतर्कता बाळगणे अत्यावश्यक आहे. आकाशात वीज चमकल्यानंतर १0 सेकंदांनी मेघ गर्जनांचा आवाज आल्यास तिथल्या अंदाजे तीन किलोमीटर परिसरात वीज पडण्याची शक्यता असते. मजबूत असलेले पक्के घर हे यापासून वाचण्याचे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. पाण्यात असाल किंवा तलावात काम करीत असाल, ओल्या शेतात रोप लावण्याचे व अन्य काम करणार्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे. पोहणारे, मच्छीमारी करणार्यांनी तत्काळ पाण्यातून बाहेर पडावे, शेतात काम करीत असल्यास सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतला नसेल तर शक्यतो जिथे आहे तिथेच राहावे. शक्य असेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोनही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवून बसा, परंतु डोके जमिनीवर ठेवू नका. धातूपासून बनविलेल्या वस्तू जसे कृषियंत्र आदींपासून दूर राहावे. गाव, शेत, आवार, बागबगिचा आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपन घालू नका. कारण ते विजेला सहजतेने आकर्षित करते. छोट्या झाडाखाली उभे राहू नका. उंच जागेवर झाडांवर चढू नका. जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा. वृक्ष, दलदलीच्या ठिकाणी तथा पाण्याचे स्रोत यापासून शक्यतो दूर राहावे, मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी राहावे, एकाचवेळी एकाच ठिकाणी जास्त व्यक्तींनी राहू नये. दोन व्यक्तींमधील अंतर किमान १५ फूट असेल असे राहावे. धातूची कांडी असलेल्या छत्रीचा उपयोग करू नये. भ्रमणध्वनी, टेलिफोन यांना स्पर्श करू नये. वीज वाहक वस्तूंपासून दूर राहावे. रेडियम, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप, पाण्याचे नळ, फ्रिज, विद्युत उपकरणे बंद ठेवावे, शक्यतो घरातच राहावे. अशावेळी प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नये. दोनचाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जावे. अशावेळी वाहनातूनसुद्धा प्रवास करणे धोक्याचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. वाहनात प्रवास करत असाल तर वाहनातच राहावे, वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नये. उंच वृक्षाच्या खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे. म्हणजे हे झाड सुरक्षित होईल. आपले घर, शेती आदींच्या आसपास कमी उंचीची चांगल्या प्रतीची फळझाडे लावावीत. कपडे वाळविण्यासाठी सुतळी अथवा दोरीचा वापर करावा. शक्य असत्यास गाव किंवा वस्तीपासून थोड्या अंतरावर उंच ठिकाणी पाण्याची टाकी, वीज अटकाव यंत्रणा बसवावी. वीज पडल्यास मुख्यत: मानवी हृदय व श्वसन प्रक्रियेत अडथळा येतो. विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाजवळील भागाच्या परिसरात हाताने मालिश करावी व तोंडाने श्वसन प्रक्रियेत मदत करावी आदी प्रकारची काळजी घेतल्यास व्यक्ती पावसाळ्यात पडणार्या विजेपासून शेताचे व इतरांचेही रक्षण करू शकतो. तेव्हा प्रत्येकाने सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
वीज हानी टाळण्यासाठी दक्षता घ्या
By admin | Updated: May 31, 2014 00:13 IST