शिक्षकांना तंबी : शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्रयवतमाळ : नोकरी करतानाच आणखी चांगले पद प्राप्त करण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा उत्तम मार्ग आहे. अनेक शिक्षक यात अग्रेसर आहेत. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय शिक्षकांना आता स्पर्धा परीक्षा देता येणार नाही. तसे केल्यास त्यांना कार्यमुक्त करता येणार नाही, अशी तंबी दिली आहे.शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या फारशा संधी नाहीत. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदांपर्यंतच ते पोहोचू शकतात. अशावेळी अनेक महत्त्वाकांक्षी शिक्षक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदांसाठी प्रयत्न करतात. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये बसणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. अनेक शिक्षक त्यात यशस्वी होऊन शिक्षण विभागाकडे कार्यमुक्त करण्याचे प्रस्ताव पाठवितात. मात्र, त्यावेळी शिक्षकांना कार्यमुक्त करताना शाळांची गोची होते. नवे शिक्षक नियुक्त करण्यापर्यंत शाळा वाऱ्यावर असते. ही बाब लक्षात घेऊन आता शिक्षण विभागाने नियम कडक केले आहे. आतापर्यंत शिक्षक पंचायत समिती स्तरावर परवानगी घेऊन स्पर्धा परीक्षेला बसायचे. मात्र, आता त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांचीच पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. पूर्वपरवानगी न घेता एखादा शिक्षक स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि त्याने कार्यमुक्तीचा प्रस्ताव पाठविला, तर त्याला तातडीने कार्यमुक्त करता येणार नाही, अशी सूचना दिली आहे. परवानगी न घेता स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास संबंधित शिक्षकाला सहज कार्यमुक्त करण्यात येणार नाही. त्याचा राजीनामा मंजूर झाला तरी, एक महिन्याचे आगाऊ वेतन कापल्यानंतरच कार्यमुक्त करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
स्पर्धा परीक्षा द्यायची, तर परवानगी घ्या!
By admin | Updated: September 28, 2015 02:42 IST