लोकमत न्यूज नेटवर्कवणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषिक्रांती योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. या योजनेसाठी गरजू शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन वणी पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकरी आणि अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी स्वावलंबन व कृषिक्रांती योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येत होता. याअगोदर या योजनेतून विहिरीसाठी अडीच लाख रुपये देण्यात येत होते. परंतु, हे अनुदान चार लाख रुपये करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषिक्रांती योजनेअंतर्गत लाभार्थी निवड निकष, यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. चालू वर्षाचे उत्पनाचे प्रमाणपत्र, शेतकऱ्यांच्या नावे सातबारा व आठ-अ उतारा, आधार कार्ड, आधार संलग्न बैंक खाते पुस्तिका, किमान एक एकर व कमाल १५ एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे. ऑक्टोबर २०२४ पासून शासन निर्णयान्वये दोन्ही योजनेच्या विविध बाबी, घटकांचे आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
योजनांचा लाभ घेण्यासाठी करावेत ऑनलाइन अर्जया योजनेअंतर्गत अर्ज स्वीकृती, लाभार्थी निवडीपासून ते अनुदान १ अदा करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही महा-डीबीटी पोर्टलद्वारे सुरू आहे.योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
योजनेमधील या आहेत घटक-अनुदान मर्यादा
- नवीन विहीर अनुदान चार लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपये, विद्युत पंप संच अनुदान ४० हजार रुपये, वीज जोडणी आकार अनुदान २० हजार रुपये दिले जाणार आहे.
- सोलर पंप जोडणी आकार अनुदान ५० हजार रुपये, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण अनुदान दोन लाख रुपये, ठिबक सिंचन संच अनुदान ९७ हजार रुपये, तुषार सिंचन संच अनुदान ४७हजार रुपये दिले जाणार आहे.
- डिझेल इंजिन अनुदान ४० हजार रुपये, पीव्हीसी पाइप अनुदान ५० हजार रुपये, यंत्रसामग्री (बैलचलित / ट्रॅक्टर चलित अवजारे) ५० हजार रुपये, परसबाग अनुदान पाच हजार रुपये दिले जाणार आहे. याचा फायदा आता शेतकरी लाभार्थ्यांना होणार असल्याने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.