यवतमाळ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची तलवारीने हत्या केली. ही घटना मंगळवारी ३ जून रोजी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास वडगाव जंगल पोलिस ठाणेअंतर्गत यावली (कारेगाव) येथे घडली. वडील आईवर तलवारीने हल्ला करत आहेत, हे पाहून मुलगा आईच्या बचावासाठी धावला. त्याने वडिलांचा प्रतिकार केला असता त्यात आराेपी वडील खाटेवर पडून गंभीर जखमी झाले. त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
बेबीबाई दलुराम राठाेड (५६), असे मृत महिलेचे नाव आहे. तर दलुराम गुलाब राठाेड (५९), असे आराेपीचे नाव आहे. दलुराम हा संशयी प्रवृत्तीचा हाेता. यातूनच त्याने मंगळवारी पहाटे बेबीबाईसाेबत वाद घातला. घरातील तलवार काढून बेबीबाईवर वार केला. आईचा आवाज ऐकून शेजारच्या खाेलीतील मुलगा संदीप दलुराम राठाेड हा तेथे धावून आला. वडिलांच्या तावडीतून आईला वाचविण्यासाठी त्याने वडिलांना जाेरात धक्का दिला. यात दलुराम घरातील खाटेवर काेसळला. त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. तर दुसरीकडे बेबीबाईला वर्मी घाव बसल्याने जागेवरच गतप्राण झाली, अशी तक्रार संदीप दलुराम राठोड यांनी वडगाव जंगल पोलिस ठाण्यात दिली. आरोपी दलुराम राठोड गंभीर जखमी झाला असून, यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. ठाणेदार विकास दांडे, उपनिरीक्षक भाऊराव बोकडे, अक्षय डोंगरे, पिंटू दोनाडकर यांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई केली. याप्रकरणी वडगाव जंगल पाेलिसांनी दलुराम राठाेड विराेधात कलम १३०(१) भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव जंगल पोलिस ठाण्याचे ठाणेदार विकास दांडे प्रकरणाचा तपास करीत आहेत.