यवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे दुष्काळग्रस्त सहाय्यता आंदोलन केले जाणार आहे. या अंतर्गत ८ डिसेंबर रोजी रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले जाणार आहे. जिल्हाध्यक्ष आशिष मानकर यांच्या संयोजनात होणाऱ्या या आंदोलनात आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज मुंदे, प्रदेश सरचिटणीस अनिरुद्ध पाटील चोंढीकर आदी सहभागी होणार आहे. कपाशीला प्रतिक्विंटल सहा हजार ५०० रुपये भाव आणि धान उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस द्यावा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दहा लाखांची मदत जाहीर करावी, खासगी बँका, फायनान्स कंपनीच्यांच्या कर्ज वसुलीवर एक वर्षासाठी बंदी घालावी, तालुकास्तरावर दुष्काळग्रस्त सहाय्यता कक्ष स्थापन करून तेथे एक खिडकी पद्धतीची प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करावी, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा पुढील सहा महिने एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्त सहाय्यता निधीत वर्ग करावा, पाण्याच्या टँकरचे गावनिहाय वेळापत्रक तयार करून त्याला प्रसिद्धी द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के पीककर्ज माफ करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
रायुकाँचे दुष्काळग्रस्तांसाठी साहाय्यता आंदोलन
By admin | Updated: December 6, 2014 22:57 IST