यवतमाळ : स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यवतमाळातील राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संदीप बाजोरीया यांनी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार तानाजी सावंत यांना पाठिंबा जाहीर केल्याची घोषणा राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रपरिषदेत केली. राष्ट्रवादीला सातारा-सांगली आणि पुणे येथे शिवसेना-भाजपाने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यवतमाळात राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराला मदत करणार असल्याचे सांगण्यात आले. विधान परिषदेत राष्ट्रवादीची काँग्रेससोबत आघाडी झाली नाही. परिणामी राष्ट्रवादीने मतांची गोळाबेरीज करण्यासाठी विद्यमान आमदार संदीप बाजोरीया यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले. पक्षाकडे केवळ ९० इतके संख्याबळ असून उर्वरित १४० मतदारांचे पाठबळ मिळवायचे होते. हा आकडा गाठणे अशक्य असल्याने यवतमाळात राष्ट्रवादीने युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार मनोहरराव नाईक म्हणाले. २०१० विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री मदन येरावर यांनी पाठिंबा दिल्यानेच आवश्यक संख्याबळ जुळविता आले. यंदाही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवारी दाखल केली. मात्र राज्यस्तरावर काँग्रेससह आघाडी झाली नाही. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यानी दिलेल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी सांगली-सातारा येथे शिवसेनेकडून पाठिंबा घेतला आहे. त्यासाठीच पक्षाने यवतमाळात युतीला पाठिंबा जाहीर करण्याचा आदेश दिला. पक्षादेशामुळे युती उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे बाजोरिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्षाचा युतीला पाठिंबा
By admin | Updated: November 13, 2016 03:01 IST