आदिवासी वसतिगृह : शौचालयाची दुरवस्था, विद्यार्थ्यांना बडतर्फ करण्याची धमकी देवेंद्र पोल्हे - मारेगावएखाद्या कारागृहात अट्टल गुन्हेगारांना जसे ठेवले जाते, तशी सुविधा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळत आहे़ निकृष्ट दर्जाचे जेवण, निवासी खोल्यात दिवे, पंखे यांचा अभाव, कारागृहासारख्या बंदीस्त खोल्या, तुटलेले पलंग, जीर्ण अंथरूण, अस्वच्छ शौचालये यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़ या विरूध्द आवाज काढला, तर त्यांना बडतर्फ करण्याची धमकी दिली जात आहे़तालुक्यातील आदिवासींच्या (एस़टी़) मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या, या हेतूने मारेगाव येथे ७५ विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वसतिगृह सुरू करण्यात आले़ या वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर शासन दरवर्षी लाखो रूपये खर्च करते़ विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक गृहपाल, सफाई कामगार, शिपाई, चौकीदार व लिपीक यांचा ताफा वसतिगृहात आहे़ तथापि या वसतिगृहात गैरसोयींनी उच्चांक गाठला आहे़ वसतिगृहात कार्यरत कर्मचारी मनमानीपणे वागतात़ ते अनेकदा वसतिगृहात उपस्थित राहात नाही़ अतिशय अपुऱ्या खोल्यांमध्ये वसतिगृहात गुरे कोंबल्यासारखे दाटीवाटीने विद्यार्थ्यांचे बेड टाकलेले आहे़ विद्यार्थ्यांच्या खोलीत हवा व प्रकाश जायला खिडक्या नाहीत़ बरेच पंखे नादुरूस्त आहे. जे पंखे सुरू आहेत, ते केवळ फिरतात, त्यांची हवा लागतच नाही़ बऱ्याच खोलींमधील दिवे होल्डर नसल्याने बंद आहेत. विजेची फिटींग अतिशय जीर्ण झाली असून अनेक ठिकाणी वीज वाहक तारा, होल्डर, बटाणा खुल्या आहेत़ त्यामुळे जीवावर उदार होऊन विद्यार्थी या वसतिगृहात कसेबसे वास्तव्य करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.स्वच्छतेच्या बाबतीत तर फारच गहन समस्या आहे. संपूर्ण वसतिगृहभर शौचालयाचा घाणेरडा दुर्गंधीचा वास येतो़ शौचालय नियमित साफ केले जात नाही, अशी विद्यार्थ्यांची ओरड आहे़ काही शौचालये घाण साचल्याने बंद पडले आहेत़ वसतिगृहात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे़ विद्यार्थ्यांच्या बेडसिटा कधीही धुतल्या जात नाही़ गाद्या फाटलेल्या आहे़ बेड तुटलेले आहेत. दारे-खिडक्याही तुटलेल्या आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे़या वसतिगृहाची ‘मेस’ चालविण्याचा कंत्राट पांढरकवडा येथील एकाला देण्यात आला आहे. कंत्राटदार मात्र कधीही येथे येत नाही़ त्यांनी दोन महिला स्वयंपाकासाठी नियुक्त केल्या आहेत़ जेवण व या मेसची अवस्थाही दयनीय झाली आहे़ भाजीपाला, किराणा, अन्नधान्य उघड्यावर टाकून ठेवले जाते़ त्याच खोलीत जलतनाची लाकडेही ठेवलेली असतात. अगदी वसतिगृहाला लागून ‘मेस’ असताना वसतिगृहात अग्निशमनाची कोणतीही व्यवस्था नाही.या वसतिगृहात असलेल्या पाण्याच्या टाक्या भरून धो-धो पाणी खाली वाहते़ परंतु मोटारपंप बऱ्याच वेळा बंद केला जात नाही़ त्यामुळे वसतिगृहाच्या भोवताल चिखलाचे साम्राज्य आहे़ गैरसोयींचा अतिरेक झाल्यानंतर वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील गेडाम, तुळशिराम पेंदोर, मोरेश्वर पेंदोर, विजय मेश्राम, वासुदेव टेकाम, गणेश आत्राम, केशव मडावी आदींना भेटून आपली व्यथा मांडली़ त्यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री ८ वाजताच्या सुमारास वसतिगृहाला भेट दिली असता गृहपाल, शिपाई, सफाई कामगार गैरहजर आढळले. सूचना मिळाल्यानंतर गृहपाल तेथे आले. त्यांनी उपस्थितांना हात जोडून माझ्या पोटावर मारू नका, असे विनवीत त्यांनी आपली बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र आदिवासी विद्यार्थ्यांबाबत त्यांना काहीही घेणे-देणे नव्हते.
विद्यार्थी भोगतात नरक यातना
By admin | Updated: August 12, 2014 00:11 IST